गोंदिया : विधानसभा निवडणुकीतील या नव्या घडामोडीमुळे अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या तिसऱ्या आघाडी प्रहार संघटनेत प्रवेश केल्यामुळे आणि अर्जुनी मोरगाव मतदार संघातून तिसरा आघाडीची उमेदवारी मिळवली तर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीच्या उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या करिता काहीशी सोपी वाटत असलेली ही निवडणूक चुरशीची ठरणार असल्याची शक्यता बळावली आहे.
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथीला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या चंद्रिकापुरे पिता पुत्रांनी गुरूवार २४ ऑक्टोबर रोजी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करीत तिसऱ्या आघाडीत प्रवेश केला आहे. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी तिसऱ्या आघाडीत प्रवेश करून त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाची दिशा ठरवली आहे.
हेही वाचा : ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा; ‘दाना’ चक्रीवादळ मध्यरात्रीनंतर…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व खासदार प्रफुल पटेल यांनी तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यावर तोडगा काढत त्यांनी तिसऱ्या आघाडीत प्रवेश करून आपल्या समर्थकांना नवीन पर्याय दिला आहे. या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे स्वागत करत त्यांचा अनुभव पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असे मत व्यक्त केले. चंद्रिकापुरे यांचा हा निर्णय पक्षाच्या स्थानिक आणि राज्य पातळीवरील राजकारणावर मोठा प्रभाव पाडणार असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा : शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता; दिवाळीपूर्वी मिळणार वेतन, पण…
काँग्रेस उमेदवार तर्फे विना ए बी फॉर्म अर्ज दाखल
अर्जुनी मोरगाव मतदार संघातून आज गुरुवार 24 सप्टेंबरला गोंदिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांची संख्या बघता माजी आमदार दिलीप बनसोडे यांनी आज काँग्रेस तर्फे दाखल करण्यात आलेल्या आपल्या अर्जाला एबी फॉर्म जोडलेला नाही त्यामुळे त्यांची उमेदवारी अर्जुनी मोरगाव विधानसभेतून काँग्रेस तर्फे निश्चित असली तरी पक्षाद्वारे अवलंबिली या रणनीतीमुळे काहीशी बंडखोरी समविण्यात यश येईल अशी अपेक्षा स्थानिक काँग्रेस जन व्यक्त करीत आहेत.