गोंदिया : शासकीय रुग्णालयांचे नाव घेताच असंख्य समस्या डोळ्या समोर येतात. गोंदिया जिल्ह्यातील ११ ग्रामीण रुग्णालयांमध्ये अनेक वर्षांपासून डॉक्टर, बालरोगतज्ज्ञ आणि परिचारिकांची शेकडो पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाकडून समोर आली आहे. या रिक्त पदांमुळेच रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना गोंदिया किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे.
गोंदिया जिल्हा रुग्णालयाच्या नियंत्रणाखाली गोरेगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोर., देवरी, सालेकसा, आमगाव, गोंदिया, तिरोडा या तालुक्यात १ जिल्हा रुग्णालय, १ जिल्हा महिला रुग्णालय, १ उपजिल्हा रुग्णालय आणि १० ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रथम श्रेणी डॉक्टरांची २२ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ ३ पदे भरण्यात आली आहेत. बालरोग तज्ज्ञांची ११ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ २ पदे भरण्यात आली आहेत. द्वितीय श्रेणी डॉक्टरांची ९२ पदे मंजूर असली तरी प्रत्यक्षात केवळ ५४ पदे भरण्यात आली आहेत. त्यापैकी १९ डॉक्टर कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. अशाच प्रकारे परिचारिकांची सुद्धा ३०६ पदे मंजूर आहेत. मात्र केवळ ११६ पदे भरली आहेत. तांत्रिक कर्मचाऱ्यांची १२५ पदे मंजूर झाली असली तरी केवळ ५६ पदे भरण्यात आली आहेत. अश्या प्रकारे गोंदिया ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये शेकडो पदे रिक्त आहेत.
हेही वाचा : गडचिरोली : मेडीगड्डा धरणावरील पूल खचला, सिरोचा तालुक्याला धोक्याचा इशारा, २० गावांतील शेतकऱ्यांना फटका
रिक्त पदे असूनही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे कुटुंबीय गोंदिया किंवा खासगी रुग्णालयात जाऊन उपचारासाठी दारोदारी भटकत राहतात.मोठ्या प्रमाणात रिक्त पदे न भरल्याने उपलब्ध कार्यरत डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. या सगळ्यामुळे त्याच्याही अडचणी वाढल्या आहेत. अशीच समस्या गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : दुर्मिळ ‘मांडूळ’ सापाला जीवदान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘या’साठी होते तस्करी
“जिल्हा, महिला आणि ग्रामीण रुग्णालयात परिचारिकांसह प्रथम, द्वितीय आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. असलेल्या कार्यरत डॉक्टर आणि परिचारिकांच्या माध्यमातून नियमित सेवा दिली जात आहे. तसेच आकडेवारी सह रिक्त पदांची माहिती वेळोवेळी प्रशासनाला कळविण्यात येत आहे.” – डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया.
हेही वाचा : गोंदिया : अवैध सागवान वृक्षतोडप्रकरणी सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी जाधव व क्षेत्रसहाय्यक पठाण निलंबित
मुंडीकोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस
तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाल्यामुळे सध्या इमारतीला कुलूप लावून हे आरोग्य केंद्र डॉक्टरांच्या क्वार्टरमध्ये सुरू आहे. मुंडीकोटा येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असून परिसरातील १२९ गावे या केंद्राच्या अंतर्गत येतात. या केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी आणि इतर १५ कर्मचारी आहेत. या आरोग्य केंद्राची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात इमारतीतून पाणी टपकते. हे आरोग्य केंद्र मोडकळीस आलेली इमारत असल्याने बंद आहे. त्यामुळे तेथे कुणी जात नाही.
गेल्या चार महिन्यांपासून हे आरोग्य केंद्र डॉक्टरांच्या निवासस्थानी हलवण्यात आले आहे. मात्र याठिकाणी जागेअभावी रुग्णांची मोठी अडचण होत आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत या तिमाहीत दोनच खाटा आहेत. या आरोग्य केंद्राच्या ओपीडीमध्ये सध्या १०० ते १५० रुग्ण येत असल्याने परिसरात तापाचा उद्रेक होत आहे. मात्र पुरेशा जागेअभावी रुग्णांची अडचण होत आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत बांधण्याची मागणी जि.प.सदस्य किरण पारधी यांनी शासनाकडे केली आहे.