गोंदिया : स्नेहसंमेलन म्हटले की मुलांच्या उत्साहाला आणि आनंदाला उधाण येते. कला, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञानाचे प्रयोग, खेळ अशा अंगभूत प्रतिभेला यानिमित्ताने बहर येतो. गोंदिया जिल्ह्यातील शाळांमध्ये सध्या स्नेहसंमेलनाची धामधूम सुरू झाली असून शाळांच्या आवारात ताला-सुरांची गट्टी जमली आहे. प्ले ग्रुप, नर्सरी, पहिली, दुसरीतील विद्यार्थीही चित्रपट गितांवर थिरकत आहेत. सध्या विविध शाळा, विद्यालयांनी स्नेहसंमेलनाचा ताल धरला असून अनेक मंजूळ गाण्यांचे सूर ऐकायला येत आहेत. स्नेहसंमेलनाच्या या जोरदार तयारीमुळे बालकलाकार वेगळ्याच विश्वात रममाण होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंदिया जिल्हा व तालुका परिसरातील अनेक शाळा व विद्यालयांत स्नेहसंमेलनाची तयारी सुरू आहे. रविवारी तर सुट्टी असून सुद्धा चिमुकल्यांच्या नृत्याचे प्रशिक्षण सुरू असल्यामुळे शाळा आवारात पालकांची सुद्धा वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून आली. काही शाळांची तर प्रत्यक्ष स्नेहसंमेलनेही धडाक्यात पार पडली आहेत. काही शाळांमध्ये तयारीची धामधूम सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळत आहे.

हेही वाचा : सुनील केदार आरोपी असलेल्या घोटाळा प्रकरणाचा निकाल पुन्हा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला सुनावणी

स्नेहसंमेलन म्हणजे संबंधित शाळेच्या शैक्षणिक वर्षातील सर्वोच्च आनंदबिंदू व आनंदमेळाच असतो. याचवेळी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होतो. त्यामुळे सांस्कृतिक मेजवाणीसोबत गुणवंतांच्याही पाठीवर याचवेळी शाबासकीची थाप पडते. स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थी व्यासपिठावर आपले कलागुण सादर करतात. यावेळी पालकांकडून आपल्या पाल्यांचे खूप कौतुक केले जाते. स्नेहसंमेलनाला पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे अगदी बालवाडी चालवणाऱ्या संस्थाही स्नेहसंमेलनाचे आयोजन करतात.

हेही वाचा : “खोटे कुणबी दाखले देण्याचं काम सुरू”, छगन भुजबळांच्या आरोपांवर अमोल मिटकरी म्हणाले, “मी स्वत:…”

मंचीय साहसाचा पाया

स्नेहसंमेलनाच्या निमित्तानेच अनेकजण आयुष्यात सर्वप्रथम रंगमंचाची पायरी चढतात. स्टेज डेअरिंगची ओळख आणि सवय अशा स्नेहसंमेलनातूनच झाल्याचे अनेक मान्यवर कलावंत आवर्जून सांगतात. त्यामुळे स्नेहसंमेलन हे अनेकांच्या कलाजीवनाचा पाया घालणारे महत्वपूर्ण व्यासपिठ ठरते. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने संपूर्ण शाळेचे वातावरण चैतन्यदायी असते. स्नेहसंमेलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची तयारी उत्तम व्हावी यासाठी शिक्षक मंडळीही आपल्या जीवाचे रान करताना दिसत आहेत.

हेही वाचा : ‘महाराष्ट्र सेफ्टी’ पुरस्कारप्राप्त कंपनीतच कामगार असुरक्षित; निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

शिक्षक मंडळी आपल्या कल्पकतेने संमेलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देतात. भरभक्कम तयारी केल्यानंतर ही मुले जेव्हा रंगमंचावर उभी राहतात तेव्हा पालकांसोबत शिक्षकही भारावून जातात. अनेक दिवसांच्या परिश्रमाचे सार्थक झाल्याचीच भावना त्यांच्यामध्ये असते. पाठीवर कौतुकाची थाप हेच त्यांच्यासाठी मोठे बक्षिस असते. स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांसाठीही आनंदाची बाब झाली आहे. त्यामुळेच सध्या अनेक शाळात या स्नेहसंमेलनाची तयारी जोरदार सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gondia children enjoying season of school gatherings sar 75 css