गोंदिया : भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये राज्यातील मराठा, धनगर, गोवारी, हलबा अश्या विविध समाजांना आरक्षणाचे गाजर दाखविले होते पण त्यांना आता १० वर्ष पूर्ण होत असतानासुद्धा ते आश्वासनं पूर्ण करु शकलेले नाहीत, यामुळे या सर्व समाजात या सरकारविरूद्ध मोठ्या प्रमाणात आक्रोश खदखदत आहे. त्यामुळे आता आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चालले आहेत. दोन समाजात भांडण लावून तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने केलेलं आहे त्याचा हा परिणाम आहे. जरांगे पाटलांनी आज ज्याप्रमाणे या सरकारवर ताशेरे ओढलेले आहे, त्यामुळे सामान्य माणूस आणि समाजातील लाखो लोकांचा त्यांना पाठिंबा मिळत चाललेला आहे. ही समाजाची जनभावना या सरकारला समजत नसेल तर हे सरकार आंधळ, बहिरं, बधीर झालेलं सरकार आहे. असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर केला आहे.
रावण दहन कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात आलेले असताना ते कार्यक्रम स्थळी माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की जनतेला खोटं आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपला याचं उत्तर जनतेला द्यावं लागणार आहे. त्यांच्याच सत्तेचा परिणाम आहे की आज शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी हा वाद निर्माण झालेला आहे. ही भाजपने या राज्यात पेरलेली बीजं आहेत, ही आज महाराष्ट्राला घातक ठरत आहेत, अशी टीका ही पटोले यांनी केली.
हेही वाचा : चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठ्यासाठी सुधीर मुनगंटीवार सरसावले
सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी इंडीया आघाडी देशात द्वेष निर्माण करीत आहे व मणिपूर हा मुद्दा आताच कसा पुढे आला यावर बोलताना मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर विवस्त्र करून घाणेरड्या पद्धतीने अत्याचार केला जातो, त्यांना जाळलं जातं, हजारो महिलांवर गोळ्या झाडल्या जातात . आपल्या देशात महाभारत हे द्रौपदी आणि रामायण हे सीता मातेचे अपहरण झाल्यामुळे घडलेलं आहे. त्यामुळे महिलांवर अत्याचार होणं हे भारतमाता आणि त्यांचे सपूत कधी सहन करणार नाही, असेच आज भारतातील एका राज्यात घडत असल्यामुळे आणि केंद्रात व मणिपूरमध्ये भाजपचं सरकार असताना हे घडत असल्यामुळे त्यावर ही प्रतिक्रिया त्यांनी आपल्याच सरकारचे कान टोचण्याकरिता व्यक्त केली असेल असं मला वाटतं, माध्यम त्याचा उलटा अर्थ लावत असतील तर मला माहिती नाही.
माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आता निवडणुक लढणार नाही असे जाहीर केले आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, अखेर प्रत्येकाचं काम करायचं एक वय असतं आणि प्रत्येकाला आपल्या वयानुसार निर्णय घ्यावा लागतो. यामध्ये ५८ वर्षांची सेवा निवृत्ती असं काही नसल्यामुळे स्वत:च ठरवावं लागतं. त्यामुळेच शिंदे साहेबांनी आपली भूमिका जाहीर केली असावी आणि त्यांचा आग्रह असेल की त्यांची जागा कन्या प्रणितीला मिळावी तर काँग्रेस हाईकमांड त्यावर योग्य ते निर्णय घेईल, असे पटोले म्हणाले.