गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका म्हणजेच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कर्मभूमी आणि या कर्मभूमीत काही निवडक कार्यकर्ते त्यांच्यासाठी जीवाचे रान करणारे होते. त्यात प्रामुख्याने दिवंगत श्याम ठवरे यांचे नाव घेतले जाते. त्याचे पुत्र व पटोले यांच्या अगदी जवळचे कार्यकर्ते डॉ.राहुल ठवरे यांनी नवेगावबांध येथील भाजपच्या कार्यक्रमात शनिवार ०५ एप्रिल रोजी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह आ.परिणय फुके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला.

अलीकडच्या काळात नाना पटोले यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. ज्याना काँग्रेस पक्षाची जिल्हा व अर्जुनी मोरगाव या विधानसभेची कमान सोपविली ते नेते पदाधिकारी केवळ स्व:हीत जोपासत आहेत. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांकडून अडचण समस्या सांगून देखील त्यांना न्याय मिळत नाही. त्यांची साधी विचारपूस ही नाही, काँग्रेस पक्षातीलच नेते अडचणी निर्माण करतात. एका विशिष्ट गटाला प्राधान्य देऊन ईतरांना डावलले जात असल्यामुळे अखेर शनिवार ०५ एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती नवेगाव बांध येथील सभागृहात घेतलेल्या भाजपच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील हजारो कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतले.

भाजप विकासाचा राजकारण करत असून या क्षेत्रातील शेतकरी कामगार वंचितांना न्याय देत आहे त्यामुळेच दोन खासदार असलेला पक्ष आज संपूर्ण देशात २४० खासदारा पर्यन्त पोहचुन एक नंबरचा राजकीय पक्ष म्हणून नावारूपास आलेला आहे. प्रवेश घेतलेले डॉ.राहुल ठवरे यांचे काम अत्यंत कौतुकास्पद असून ते पक्षात आल्याने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात विशेषतः गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रात भाजप अधिक मजबूत झाला आहे. त्यांचे व त्यांच्यासह पक्षात दाखल झालेल्यांना योग्य न्याय मिळेल, असे प्रतिपादन आमदार परिणय फुके यांनी केले.

या प्रसंगी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे भाजप संघटन मंत्री बाळा अंजनकर यांनी मार्गदर्शन करताना भाजप कार्यकर्त्यांना विशेषतः या पक्षप्रवेश सोहळ्यापासून नाराज असलेल्याना भाजप नेत्यांना थेट ईशारा देत भाजप हा कुण्या एकाचा पक्ष नसून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा झालेला पक्ष आहे. आलेल्यांचा स्वागत करून जुना व नवीन कार्यकर्ता सगळ्यांना समान न्याय देणे हेच भाजपचे हित आहे. कारण भाजप हा लोकशाही तत्त्वावर चालणारा पक्ष आहे थेट ईशाराच फुले यांनी दिला. तर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी पंचायत समिती आणि बाजार समितीच्या निवडणुकित ज्यांनी पक्षाशी बेइमानी करणाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली.

भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षच हरवतो, इतरांमध्ये हरवण्याची क्षमता सध्या तरी नाही. दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्याच कार्यकर्त्यांनी आपल्याला दगा दिला, परत पक्षाने मला काय दिले असा प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र ज्यांना असं भ्रम असेल त्यांनी पक्षाच्या कमळ चिन्हा शिवाय लढून दाखवावं ,असे आव्हान दिले. प्रवेश केलेलेडॉ.राहुल ठवरे नव्या दमाचा युवा कार्यकर्ता आहे त्यांचा पक्षासाठी चांगला फायदा होईल असेही मत यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले.