गोंदिया : देवरी तालुक्यातील बोरगाव (डवकी) येथून रोवणीच्या कामासाठी फुक्कीमेटा येथे सुमारे ३३ महिला मजुरांना वाहून नेणाऱ्या पिकअप वाहनाला अपघात झाल्याने महिला मजूर जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास देवरीजवळील डवकी गावाजवळ घडली. या घटनेची नोंद देवरी पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवरी तालुक्यामध्ये रोवणीच्या कामाला सुरुवात झाल्याने अनेेक शेतकरी बाहेरगावावरून मजुरांची ने-आण करतात. अशाच प्रकारे तालुक्यातील बोरगाव येथून सुमारे ३३ महिला मजूर रोवणी कामासाठी फुक्कीमेटा येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास पिकअप वाहनाने (एमएच ३३ जे ०५१)जात असताना वाहन चालक प्रवीण विनायक राऊत याचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात हे वाहन उलटले. यामुळे वाहनात असलेले सर्व मजूर जखमी झाले. जखमींना देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी गोंदिया येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

हेही वाचा… गडकरी यांनी राजकीय नेत्यांना दिला ‘हा’ सल्ला, म्हणाले…

हेही वाचा… नागपूर : पावसाळ्यापूर्वीची कामे केली नाही म्हणून गावकऱ्यांनी काढला मोर्चा

अपघातामध्ये फुलन घासले, संयोगिता नंदेश्वर, विफुला साखरे, अनिता ठाकरे गंभीर आहेत. इतर जखमींमध्ये पूनम राऊत, केसर लांजेवार, सुनीता ठाकरे, मीरा शहारे, सीता सोनवाने, सुधा साखरे, सुनीता शहारे, महेश बालेवार, जयश्री लांजेवार, पारबता ताराम, प्रेरणा लांजेवार यांचा समावेश आहे. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत.

डवकी ते फुक्कीमेटा पूर्णतः रस्ता खराब असून या रस्त्यावरील झालेल्या अपघाताला लोकप्रतिनिधींसह प्रशासन जबाबदार आहे, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. देवरी तालुक्यात लोकांना जनावरांप्रमाणे वाहनात भरून वाहतूक केली जात असून पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gondia district due to driver lost control vehicle crashed in the farm 33 women were injured in the accident sar 75 asj
Show comments