गोंदिया : सांस्कृतिक मंत्रालय, दिल्लीद्वारे आयोजित भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात जिल्हा व तालुकास्तरावर खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नवेगावबांध व अर्जुनी-मोरगाव येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव २० ऑगस्ट रोजी होणार आहे.
आदिवासी समुदायावर अत्याचार होत आहेत. अशा परिस्थितीत आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आदिवासी समाजाच्या जखमांवर मीठ चोळून भावनांना ठेच पोहोचविण्याचा प्रकार सरकारकडून होत आहे, असा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील विविध आदिवासी संघटनांच्या माध्यमातून तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना दिलेल्या निवेदनांमधून करण्यात आली आहे.
हेही वाचा : यवतमाळ : आठ महिन्यांत १६० शेतकरी आत्महत्या; कृषिमंत्री आज जिल्ह्यात, लक्ष देणार का?
नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन, नॅशनल आदिवासी पिपल फेडरेशन, नॅशनल आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन, गोंडवाना संघर्ष कृती समिती, आदिवासी हलबी संघटना, बिरसा मुंडा सेवा समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. शिष्टमंडळात डिम्पल पंधरे, सभापती सविता कोडापे, नगरसेविका शीला उईके, पं.स. सदस्य भाग्यश्री सयाम, छाया टेकाम, राजकुमार गेडाम, किशोर पेंदाम, जितेंद्र तुमळाम व आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.