गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व सालेकसा तालुक्यातील ४८ गावे व आमगाव शहराला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा २३ डिसेंबरपासून बंद करण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे योजनेचे संचालन करणाऱ्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने थकबाकीची रक्कम योजनेचे काम पाहणाऱ्या कंपनीकडे सुपूर्द केली नाही असे बोलले जात आहे. त्यामुळे कंपनीने पाणीपुरवठा योजना चालवण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. सोमवार २३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग देवरीचे शाखा अभियंता राजेंद्र सतदेवे यांनी समाज माध्यमावर २४ डिसेंबर पासून पाणीपुरवठा योजना बंद होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार २४ डिसेंबर रोजी आमगाव आणि सालेकसा या दोन्ही तालुक्यांतील ४८ गावे आणि शहरांमध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे.पाणीपुरवठा बंद होण्याची पूर्व माहिती न मिळाल्याने पाणी बंद झाल्याने अनेकजण चिंतेत दिसून आले. तर अनेक नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करताना दिसत होते.
आमगाव नगरपरिषद तसेच ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी वेळेवर न भरल्याने ही योजना अनेकवेळा बंद पडली आहे. यातील आमगाव नगरपरिषदे अंतर्गत एकूण ८ गावे येतात. त्यापैकी आमगावची स्वतंत्र नळ योजना सुरू आहे. त्यामुळे बनगाव प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना बंद होऊनही आमगावच्या नागरिकांना आजही आमगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळते. मात्र आमगाव नगरपरिषदेत समाविष्ट इतर ७ गावांना पाणी मिळत नाही. परिणामी येथील नागरिकांना पाण्यासाठी लांबवर भटकंती करावी लागत आहे. आमगाव नगरपरिषदेकडे अंदाजे ९ लाख ५० हजार रुपये पाणीपट्टी थकीत असल्याचे समोर आले आहे. तर इतर ग्रामपंचायतींवरही लाखो रुपयांचा पाणीपट्टी थकीत आहे.
हेही वाचा : नितीन गडकरींच्या जिल्ह्यात अपघाती मृत्यू जास्त, शहराच्या तुलनेत ग्रामीणला…
ग्राहक बिले भरत नाहीत:
पाणीपट्टी वेळेवर भरली जात नसल्याने महावितरणकडून अनेकवेळा योजनेचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. एखादे वाहन खराब झाले की अनेक वेळा देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या कंपन्या वेळेवर पैसे न दिल्याने त्यांचे काम बंद पाडतात. त्यामुळे योजना चालविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विभागाकडून वारंवार नगरपरिषद, ग्रामपंचायती व ग्राहकांना पाणीपट्टी वेळेवर जमा करण्याची विनंती केली जाते. मात्र असे असतानाही कर वेळेवर जमा न केल्याने योजना बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा : नागपूरचे विमानतळ भटक्या श्वानांच्या ताब्यात, नितीन गडकरी देणार का अधिकाऱ्यांना तंबी…
रक्कम जमा होताच पाणीपुरवठा सुरू होईल
बनगाव प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनेद्वारे आमगाव नगरपरिषद क्षेत्रासह आमगाव आणि सालेकसा तालुक्यांतील ४८ गावे व शहरांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणीपट्टी वेळेवर जमा होत नसल्याने अनेकदा विस्कळीत परिस्थिती निर्माण होते. आमगाव नगरपरिषदेकडे सध्या अंदाजे ९ लाख ५० हजार रुपये थकबाकी आहे. तर इतर ग्रामपंचायतींचा लाखो रुपयांचा कर अद्यापही थकीत आहे. कर जमा होताच तो संबंधित कंपनीला भरला जाईल आणि पाणीपुरवठा तातडीने सुरू होईल, असे कार्यकारी अभियंता सुमित बेलपात्रे, यांनी सांगितले.