गोंदिया : थायलंड येथे भिक्खू बनल्यास दान म्हणून खूप पैसे मिळतील, त्यासाठी पासपोर्ट तयार करण्याचा खर्च आणि तुमच्या नातवाला नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून दोन लाख १० हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या इंजिनियरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन प्रीतीचंद मेश्राम (४३, प्लॉट नंबर-२०४ कळमना रोड, नागमंदिर जवळ, आदर्श नगर, कामठी-नागपूर) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी रोशन मेश्राम याने तिरोडा तालुक्यातील ग्राम मेंढा येथील रहिवासी येणू सदाशिव सुरसाऊत (६७) यांना स्वतः मोठ्या कंपनीमध्ये इंजिनियर होतो, माझी खूप ओळख आहे असे सांगून तुमचा नातू सुभाष बावनथडे (२३, रा. सोनपुरी, ता. किरणापूर-बालाघाट) याला नोकरी लावून देतो असे आमिष दिले. तसेच तुम्हाला थायलंडला जाण्यासाठी पासपोर्ट बनवून देतो आणि समाज कल्याण विभागातून घर मिळवून देतो असेही आमिष दिले देत त्यांच्याकडून दोन लाख १० हजार रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली.त्याचप्रकारे साक्षीदार पुष्पा संतकुमार कटरे (६४, रा. मेंढा) यांच्या घरी जाऊन त्याने मी तुमचा पासपोर्ट काढून तुम्हाला थायलंड येथे घेऊन जातो व तुम्ही भिक्खू झाले की थायलंडमध्ये भरपूर दान मिळते. त्याकरिता तुम्हाला पासपोर्ट काढावा लागेल, असे सांगून त्यांच्याकडूनही पैसे घेतले.प्रकरणी आरोपीवर भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : शाळा बुडवून खासगी शिकवणीला जाता, बारावी परीक्षेला मुकाल… नवा नियम जाणून घ्या…
पोलिसांच्या कामात अडथळा: गुन्हा दाखल
मारहाण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मूकबधिर महिलेकडे गेलेल्या पोलिसांचेच व्हिडिओ काढत धमकावल्याची घटना १४ जुलै रोजी घडली. त्या आरोपीवर तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मुक्ता डोंगरवार (७०, रा. घाटकुरोडा) या मूकबधिर महिलेला आरोपी सुरेश महादेव डोंगरवार (४६) याने आपल्या पत्नीसोबत मारहाण केली होती. या घटने संदर्भात तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस कर्मचारी व मंगलम मूकबधिर निवासी शाळेत गेले. विशेष शिक्षिका आम्रपाली विशाल फुले या महिलेला सांकेतिक भाषेत विचारपूस करून घेत होत्या.पोलीस पंचनामासाठी गेले असता आरोपी सुरेश महादेव डोंगरवार (४६)यांनी तुमचे हे कशाचे नाटक आहे असे म्हणत पोलिसांशी उद्धट वागणूक करून त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.तुम्ही विनाकारण माझ्या आईला त्रास देत आहात असे म्हणत पोलिसांचे चित्रीकरण केले. मी कोणाला घाबरत नाही तुम्हाला जे करायचे ते करा, असे म्हणत पोलिसांना धमकाविले. आम्रपाली फुले यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी आरोपी सुरेश डोंगरवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक खांडेकर करीत आहेत.
हेही वाचा : वर्धा : भल्यामोठ्या अजगरामुळे दहा गावांत अंधार…
दोनशे रुपये न दिल्याने मुलाची वडिलांना मारहाण
पैसे दिले नसल्याच्या कारणावरून रागावलेल्या मुलाने आपल्या वडिलांना मारहाण केल्याची घटना डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत रविवारी घडली. रहीम करीम शेख (६५) हे आपल्या मुलाच्या पानटपरीवर गेले असता, आरोपी जाबीद रहीम शेख (४०) हा तेथे उभा होता. आरोपी जाबीद शेख याने वडील रहीम यांना २०० रुपये मागितले असता. त्यांनी दिले नाही त्यानंतर जाबीदने २०० रुपये आपल्या धाकट्या भावाला मागितले. परंतु त्यांनी पैसे न दिल्याने जाबीदने आपल्या धाकट्या भावाला मारायला सुरुवात केली.हे बघून मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या रहीम शेख यांना जाबीदने कात्रीने मारून गंभीर जखमी केले. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी आरोपी जाबीद रहीम शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार खोटेले करीत आहेत.