गोंदिया : हिवाळा आला की, विदेशी पक्ष्यांची किलबिलाट गोंदिया जिल्हयातील तलाव, पाणवठयांवर हमखास दिसून येते. त्यामुळे जणू पक्ष्यांची जत्राच भरल्याचा भास होतो. पक्षी निरीक्षक व अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीचं असते. यंदा सहसा उपेक्षित असलेला माहुरकुडा तलावावर कधी नव्हे एवढी रेड केस्टेड या स्थलांतरित पक्ष्यांची अमाप संख्या स्थानिकांचे ,पक्षीमित्र, व अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गोंदिया तलावांचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे. जिल्हयातील तलाव, बोडया, पाणवठयांवर दरवर्षी हजारो मैल प्रवास करून स्थलांतरित पक्षी हजेरी लावतात. ज्याठिकाणी मुबलक खादय मिळते, त्या तलावांवर मोठया संख्येत स्थलांतरित विदेशी पाहुण्यांचें आगमन होते.
हेही वाचा…‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यात गोंदिया जिल्हा अव्वल
माहुरकुडाचा तलाव याबाबतीत उपेक्षित होता. दरवर्षी येथे स्थलांतरित पक्षी ढुंकूनही बघत नव्हते. परंतु यंदा त्यांची लक्षणीय संख्या कुतुहलाचा विषय ठरत आहे. या तलावावर विदेशी पाणपक्ष्यांचा वावर व किलबिलाट लक्ष वेधणारे आहे. माहुरकुडाच्या तलावावर पहिल्यांदाच एका विशिष्ट प्रजातीची मुबलक प्रमाणातं संख्या थक्क करणारी आहे. येथे सध्या सुमारे ४०० ते ५०० रेड क्रेस्टेड पोचार्ड मुक्कामी आहेत. गत पंधरा वर्षाच्या संख्येची गोळाबेरीज केली तरी यावर्षी जेवढे पक्षी आहेत. तेवढी संख्या होणार नाही, असा पक्षी अभ्यासकांचा अंदाज आहे. या तलावापासून सुमारे दोन किमी अंतरावर बुटाई तलाव आहे. येथे दरवर्षी ग्रेलेग गूज, रेड क्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, युरेशियन पिन टेल, कॉमन कूट व इतर प्रजातींचे स्थानिक व स्थलांतरित पाणपक्षी सध्या दिसत आहेत. मात्र माहूरकुडाच्या जलाशयावर एकजात हे पक्षी मोठ्या संख्येत आहेत. येथे या पक्ष्यांना आवडणारे असे कोणते खाद्य आहे की, जे या पक्ष्यांना आकृष्ट करीत आहेत, या संदर्भात ही अभ्यास होणे गरजेचे आहे.
ओळख पक्ष्यांची
रेड क्रेस्टेड पोचार्ड या पक्ष्याला मराठीत मोठी लालसरी या नावाने ओळखले जाते. याचे शास्त्रीय नाव Rhodonessa rufina असे आहे. याची सरासरी लांबी ५३ ते ५७ सेंमीपर्यंत असते. याचे डोके लालसर शेंदरी रंगाचे असून चोच लाल रंगाची असते. याची छाती व गळा काळ्या रंगाचा असतो तर शेपटीकडील भाग दुरून काळसर दिसतो. त्यांचे आवडते खाद्य पाणवनस्पती व पाणवनस्पतींचे कोंब, मूळ, लहान-मोठे जलकीटक आदी असते.
हेही वाचा…‘नासुप्र’तील दस्तावेज चोरून प्लाॅट विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ११ आरोपींना अटक, काही अधिकारीही रडारवर
गत पंधरा वर्षांपासून आम्ही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जवळपास सर्वच लहानमोठ्या जलाशयांवर हिवाळाभर भेटी देऊन पक्षी निरीक्षण करतो. अनेक ठिकाणी स्थानांतरित विदेशी पक्षी कमी-जास्त प्रमाणात नेहमीच दिसतात. मात्र यावर्षी एवढ्या संख्येत रेड क्रेस्टेड पोचार्ड एकाच ठिकाणी आढळणे हे आमच्यासारख्या पक्षीप्रेमींसाठी एक मोठी पर्वणीच आहे. १६ जानेवारी ते १ फेब्रुवारी पर्यंत साधारण १७ दिवसांचा काळ लोटून ही संख्या तेवढीच आहे. याचा अर्थ यापुढेही त्यांचा मुक्काम या तलावावर अजून काही काळ राहू शकतो. असे अर्जुनी मोरगावं येथील अजय राऊत, डॉ. शरद मेश्राम, डॉ. गोपाल पालीवाल या पक्षी मित्र व अभ्यासकांनी माहिती दिली.