गोंदिया : ऑनलाइन गेमिंग फसवणूक प्रकरणात नागपूरच्या पोलिसांनी कुख्यात बुकी सोंटू जैन प्रकरणात त्याच्या पैशाची देवाण घेवाण करणाऱ्या एक डॉक्टर, बँक व्यवस्थापकासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
सोंटू जैनला आर्थिक व्यवहारात मदत करणाऱ्या डॉ. गौरव बग्गा आणि अॅक्सिस बँक शहर शाखेचे व्यवस्थापक अंकेश खंडेलवाल यांच्या घरावर नागपूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली होती. ही कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती. यात डॉ. बग्गांच्या घरून १ कोटी ३४ लाख रोकडसह ३ किलो २०० ग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली.
या छापेमारीनंतर सोंटू, अंकेश खंडेलवाल, डॉ. गौरव बग्गा, डॉ. गरिमा बग्गा, सोंटूचा भाऊ धीरज जैन, धीरजची पत्नी श्रद्धा, सोंटूची आई कुसुमदेवी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी रात्री ॲक्सिस बँक व्यवस्थापक अंकेश खंडेलवाल, डॉ. बग्गा आणि बंटी कोठारी यांना पोलिसांनी अटक केली. सोंटूने मोबाईलमधील सर्व डेटा उडवला होता. परंतु पोलिसांनी उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करून २०० मिनिटांच्या ८ कॉल रेकॉर्डिंगसह इतर माहिती मिळविली. हे कॉल रेकॉर्डिंग अंकेश खंडेलवाल, गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी रेडिओलॉजिस्ट डॉ. बग्गा यांच्यातील आहे.
हेही वाचा : पुतळे, झेंडा हटविल्यावरून तणाव, आदिवासींचे आंदोलन सुरूच…
गोंदियातील ॲक्सिस बँक शाखेत डॉ. बग्गा यांच्या नावाने ३ नवीन लॉकर्स उघडण्यात आले. व्यवस्थापक अंकेश खंडेलवाल यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सोंटू जैनच्या सूचनेनुसार एका व्यक्तीला सोन्याने आणि रोखीने भरलेल्या ३ बॅग दिल्याचे उघड झाले. तिन्ही बॅग्स गोंदिया येथील बंटी कोठारी याच्याकडे सापडल्याचे सोंटूने पोलिसांना सांगितले.
हेही वाचा : तीन ‘वसुलीबहाद्दर’ पोलीस कर्मचारी निलंबित
डॉ. बग्गा बडतर्फ
दरम्यान, बुकी सोंटू जैन प्रकरणात डॉ. बग्गा यांचे नाव आल्याची माहिती आम्हाला लेखी स्वरुपात मिळाली. त्यानुसार आम्ही गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने कर्तव्यावर असलेल्या डॉ. गौरव बग्गा यांना बडतर्फ केले आहे. त्यांची पत्नी डॉ. गरिमा बग्गा यांच्याबद्दल कोणतीही माहिती पोलिसांनी सध्या तरी दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्या स्थायी आहेत. पोलिसांनी आम्हाला लेखी माहिती दिली तर त्यांच्यावरही विभागीय कारवाई करण्यात येईल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमग्रज घोरपडे यांनी सांगितले.