गोंदिया : २०१४ विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पत्रपरिषद घेऊन भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे २ जुलैला महायुती सरकारला दिलेला पाठिंबा हा कुण्याही यंत्रणेच्या भीतीपोटी नव्हे तर महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी दिला, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टीकाकारांना दिले.
‘निर्धार नवपर्वाचा’, ‘घड्याळ तेच वेळ नवी’ अभियानांतर्गत गोंदियात एन.एम.डी. महाविद्यालयातील सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. तटकरे म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती नेतृत्व देण्याचे काम जनतेने केले, त्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेचे मानले आभार. बारामतीतील ग्रामपंचायतीच्या १२ पैकी १२ जागा राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) गटाने जिंकल्या आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत बारामतीची जनता काय करणार आहे, याचे उत्तर जनतेने आजच्या निकालातून दिल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी अकोल्यातील तरुणाची पुण्यात आत्महत्या
प्रफुल्ल पटेल यांचा अनेक वर्षांचा अनुभव आणि अजित पवार नावाचे असलेले ग्लॅमर याचा फायदा आम्हाला झाला आहे. त्यामुळेच ४५ आमदार दादांच्या पाठीशी उभे राहिले, शिवाय नागालँडमधील आमदारांनीही पाठिंबा दिला. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही तटकरे यांनी सांगितले.