गोंदिया : ‘लाडकी बहीण’योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करायला जाताना झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. येथील वडसा-कोहमारा मार्गावरील मोरगाव टी-पॉईंटवर बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली. शिवलाल चुन्नीलाल लाडे (४२, रा. निलज, ता.अर्जुनी/मोरगाव), असे मृताचे नाव आहे. ते ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी अर्जुनी/मोरगाव तहसील कार्यालयात पत्नीसह जात होते. मात्र, एक महत्त्वाचे दस्तावेज घरी विसरल्यामुळे शिवलाल एकटेच घरी परत जात होते. वाटेत हिमालया बारसमोर वडसाकडून कोहमाराकडे जाणाऱ्या विनाक्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना अर्जुनी/मोरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथील डाॅक्टरांनी शिवलाल यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

शिवलाल यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रकचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्जुनी/मोरगाव पोलिसांनी पाठलाग करून नवेगाव बांधजवळ ट्रक पकडला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. दरम्यान, पत्नीला ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळावा, यासाठी शिवलाल लाडे यांची धडपड अखेरची ठरली. अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीट अंमलदार रोशन गोंडाणे करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असतानाच सायंकाळी आणखी एक अपघाताची घटना घडली.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’नी धरली माहेरची वाट , काय आहे कारण ?

वाहतूक पोलिसांच्या वाहनाला ट्रकची धडक, हवालदाराचा मृत्यू

नागपूर-रायपूर आंतरराष्ट्रीय महामार्गावर देवरी मासुलकसा घाट येथे लोखंडी सळया घेवून जाणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने वाहतूक पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात एका वाहतूक पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला, तर एक सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. मनीष बहेलीया, असे मृत हवालदाराचे, तर सहायक पोलीस निरीक्षक दिनेश लील्हारे व हवालदार योगेश बनोटे, अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : वसतिगृहे अधिकाऱ्यांची खासगी मालमत्ता नाही, उच्च न्यायालयाचे कठोर शब्दात ताशेरे; प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरकडून रायपूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या लोखंडी सळया भरलेल्या ट्रकने (क्र. सी.जी.०८- ए.के. १४०२) विरुद्ध दिशेने देवरीवरून सडक अर्जुनीकडे येत असलेल्या महामार्ग वाहतूक पोलिसांच्या वाहनाला (क्र. एम.एच.१२/आर.टी.९६२५) जबर धडक दिली. यात हवालदार मनीष बहेलिया यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना जवळील देवरी ग्रामीण रुग्णालयात व नंतर गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. देवरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.