गोंदिया : मुंबई – हावडा रेल्वे मार्गावरील नागपूर-रायपूर ते रायपूर-नागपूर दरम्यान धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पूर्णतः बिघडले आहे. सकाळची गाडी सायंकाळी आणि सायंकाळची गाडी सकाळी धावत आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवासी संबंधित अधिकारी, प्रवासी संघटना, स्थानिक रेल्वे कमिटी आणि लोकप्रतिनिधींनाही ही समस्या सांगतात मात्र, दखल कोणीही घेत नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या हावडा-मुंबई या रेल्वे मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक मागील पाच-सहा महिन्यांपासून पूर्णतः बिघडले आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस, सुपर फास्ट या गाड्यांसह लोकल पॅसेंजर गाड्या तासन् तास उशिरा धावत आहेत. नाॅन इंटरलाॅकींग आणि अन्य दुरुस्तीची काही कारणे देऊन रेल्वेचा प्रवाशांना त्रास देण्याचा हा प्रकार सर्रास सुरू आहे. आझाद हिंद एक्स्प्रेस, अहमदाबाद एक्स्प्रेस, लोकल, इंटरसिटी एक्स्प्रेस, छत्तीसगढ एक्स्प्रेस, गोंडवाना एक्स्प्रेस यासह अन्य लांब पल्ल्याच्या गाड्या नेहमीच पाच ते सहा तास उशिरा धावत आहेत. काही गाड्या दोन ते तीन तास विलंबाने धावत आहेत.
हेही वाचा : “राजकारणात काहीही होऊ शकते,” धर्मरावबाबा आत्राम असे का म्हणाले?
इतकेच नव्हे, तर रेल्वेच्या नवीन धोरणानुसार मालगाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. रायपूरकडून नागपूरच्या दिशेने धावणाऱ्या प्रवासी गाड्या गुदमाजवळ तासनतास उभ्या केल्या जात आहेत. मागेहून येत असलेल्या पाच ते सहा मालगाड्या समोर सोडल्याशिवाय या थांबलेल्या प्रवासी गाड्यांना हिरवा कंदील दिला जात नाही. त्यामुळे गोंदिया रेल्वेस्थानकावर रात्रीला प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येते.
हेही वाचा : थंडीची चाहूल! अनेक राज्यांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; भारतीय हवामान खाते म्हणते…
रेल्वेची वाट पाहून प्रवासी प्रचंड वैतागून जात आहेत. उल्लेखनीय म्हणजे, या भागाचे खासदार सुनील मेंढे आणि राज्यसभा सदस्य खा. प्रफुल्ल पटेलांनी काही दिवसांपूर्वीच रेल्वेने प्रवास केला. समस्या जाणल्या, रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक सुरळीत केले जाईल, असेही सांगितले. मात्र, अद्यापही हे वेळापत्रक रूळावर आले नाही. त्यामुळे प्रवाशांनी कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
हेही वाचा : कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे संकट; शेतकरी चिंतेत, हिरवे स्वप्न…
पुन्हा ३३ गाड्या रद्द
नाॅन इंटरलाॅकींग आणि अन्य कारणे समोर करत रेल्वेने ११ ऑक्टोबरपासून ते १५ ऑक्टोबरपर्यंत मुंबई हावडा मार्गावरील ३३ गाड्या रद्द केल्या आहेत. याचा फटकाही पुढे नवरात्र, दसरा, दिवाळी या सणासुदीच्या काळातही सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे. १२८५५ आणि १२८५६ क्रमांक असलेली नागपूर ते बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस ८ ते १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. अन्य गाड्याही वेगवेगळ्या तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत.