गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसमुळे २०१४ मध्ये आघाडी सरकार पडलं, या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. पृथ्वीराज चव्हाणांना वाटत असेल की, २०१४ पूर्वीचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पडले तर ते आजही राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीत का आहेत? त्यांनी ही आघाडीच मुळात करायला नको होती. त्यानंतर ते स्वत: आमदार झाले ते आघाडीचे उमेदवार म्हणूनच. त्यामुळे आज आरोप करणे चुकीचे आहे, असे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. ते लाखांदूर येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ व मोळी पूजन कार्यक्रमात आले असता माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा : यवतमाळ : बालनगरीत उघडला पुस्तकांचा दवाखाना! मुलं करतात जीर्ण पुस्तकांवर उपचार
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युगपुरुष म्हटल्यावरून सुरू असलेल्या वादावर पटेल म्हणाले की, नरेंद्र मोदी नक्कीच या देशाचे मोठे नेते आहेत. एक व्यक्ती ज्याची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही तो आज पंतप्रधान म्हणून मागील साडेनऊ वर्षांपासून देशाचा कारभार चालवत आहे. त्यांनी केलेल्या कामांमुळे जनतेत लोकप्रियता निर्माण झाली आहे. त्यामुळेच ते दोनदा जिंकून आले, असेही पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा : वर्धा : फसवणूक करीत मंडळाचे विश्वस्त झाले; सात जणांविरोधात गुन्हे दाखल
छगन भुजबळ दोन समाजात तेढ निर्माण करीत आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. यावर बोलताना पटेल म्हणाले की, छगन भुजबळ आज जे काही करीत आहेत ते ओबीसी समाजाच्या हितासाठी करत आहेत. त्यांचा पूर्वीपासूनच ओबीसी समाजाला न्याय मिळून देण्याकरिता लढा राहिलेला आहे. त्याच अनुषंगाने ते आज बोलत आहेत. त्यांची आणि आमच्या राष्ट्रवादी ( अजित पवार) गटाचीही हीच भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. त्याकरिता सरकारने समिती नेमलेली आहे. त्या समितीचे काम सुरळीत सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आमचे सरकार थांबणार नाही. माझी जरांगे पाटलांना विनंती आहे की, त्यांनी थोडा धीर धरावा. एकदम टोकाची भूमिका घेण्यापेक्षा संयम बाळगावा, असेही खासदार पटेल याप्रसंगी म्हणाले.