गोंदिया : लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकला तर संविधान बदलले जाईल, हा केवळ विरोधकांचा आरोप आहे. असे काहीही होणार नाही. याबाबत माझा मोदींवर विश्वास आहे. परंतु, संविधान बदलण्याचे प्रयत्न होताना दिसलेच तर सर्वात आधी मी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देईल, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका व्यक्त केली.
गोंदिया येथे भाजप युतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारार्थ आले असता त्यांच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीत जागावाटपात अखेर सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नाही. यात शिवसेना वरचढ ठरली. अशा परिस्थितीत काँग्रेसने महाविकासआघाडीतून बाहेर पडले पाहिजे, असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला.
हेही वाचा : मोदींना साथ देण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीसोबत यावे – बावनकुळे
भाजप लोकसभेच्या प्रचारामध्ये गुंडाचा वापर करत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला होता यावर बोलताना आठवलेंनी कविता सांगितली,
आम्ही आणत नाही प्रचारामध्ये गुंडे,
कांग्रेसकडे येणार आहेत पैशाचे हांडे
इंडीया अलायंसमध्ये मी पाहिले आहेत अनेक प्रकारचे झेंडे,
त्यामुळेच गोंदिया भंडारातून निवडून येणार आहेत आमचे सुनिल मेंढे
हेही वाचा : क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
आठवले पुढे म्हणाले, आपण शिर्डीची जागा मागितली होती. पण, देण्यात आली नाही. लोकसभेत त्यांचे ४०० पार चे धोरण ठरल्यामुळे त्यांनी यावेळी जागा देण्यास नकार दिला. पण त्या मोबदल्यात केंद्रात एक मंत्री पद आणि विधानसभेत मंत्री पद आणि महामंडळ देणार असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे आपण आपली मागणी मागे घेतल्याचे आठवले यांनी सांगितले.