गोंदिया: नगर परिषद गोंदिया येथील मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ हे मागील अडीच महिन्या पासून गोंदिया नगर परिषदेतील त्यांच्या खुर्चीवर बसलेले नाही. २६ फेब्रुवारी २०२४ पासून मुख्याधिकारी नी गोंदिया नगर परिषद येथे पदभार सांभाळला. पण तेंव्हापासून ते नगरपरिषदेची पायरी पण चढले नाही. याचा विरोध म्हणून आज हरीश तुळसकर (युवासेना गोंदिया जिल्हा अध्यक्ष) यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी साहेब यांच्या खुर्चीवर माल्यार्पण करण्यात आले व मुख्याधिकारी यांचा शोध घेणाऱ्यास ११००/- रुपयांचे परितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी कधी लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली तर कधी इतर कारणांनी नगर परिषदेत अनुपस्थित राहतात. त्यामुळे नागरिकांचे कामे होत नाही. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक होऊन १ महिन्याच्या काळ लोटला पण मुख्याधिकारी कार्यालयात दिसत नाही त्यामुळे त्यांच्या खुर्चीला माल्यार्पण करण्यात आले व त्यांना शोधणाऱ्यास ११०० रूपयांचे बक्षिसही युवासेनातर्फे जाहीर करण्यात आले. २५ मे २०२४ पर्यंत गोंदिया नगर परिषदेत मुख्याधिकारी उपस्थित न झाल्यास त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली जाणार, असा इशाराही हरीश तुळसकर यांच्याकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा : बुलढाणा : जिल्हा मुख्यालयातील बहुतेक फलक अवैध
या प्रसंगी प्रामुख्याने शिवसेना जिल्हा समन्वयक सूनील लांजेवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तेजराम मोरघडे, गोंदिया तालुका समन्वयक संजु समसेरे, महिला संघटक रुपाली रोटकर, युवासेना जिल्हा उपप्रमुख विक्की बोमचेर, युवासेना गोंदिया तालुका अध्यक्ष दुर्गेश किरनापुरे, युवासेना तिरोडा तालुका अध्यक्ष साहुल कावळे, मुंडीपार शाखा प्रमुख कपिल नेवारे, जुबेर भाई, सौरभ बोरकर, युवासेना गोरेगाव शहर अध्यक्ष धर्मा बनसोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.