गोंदिया: भाज्यांचे भाव वाढले की सर्वसामान्य नागरिकां पासून ते विविध माध्यमांतून सगळेच ओरड करू लागतात. “गृहिणींचे बजेट बिघडले” पासून तर “सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर” असे मथळे करून ओरड केली जाते. मात्र सध्या घडीला भाजीपाला उत्पादक अत्यंत वाईट काळातून जात आहेत. गोंदिया भाजी बाजारात कोणत्याही भाजीचा भाव ५० ते ६० रुपये किलोच्या वर नाही. आणि यात ही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था तर फारच बिकट आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मुख्य भाजी बाजारात टोमॅटो दीड ते अडीच रुपये किलो दराने विक्री करण्याची नामुष्की ओढवली आहे. तर या दरात पण व्यापाऱ्यांना टोमॅटो खरेदी करून त्यावर नफा मिळवणे आणि खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. एकेकाळी याच गोंदियातील मुख्य भाजी बाजारात टोमॅटो २०० रुपये प्रति किलो पर्यंत विक्री झालेला आहे. त्या दिवशी गोंदिया भाजी बाजारातील एका व्यापाऱ्याचे दहा कॅरेट टोमॅटो चोरी झाल्याचे प्रकरण पण गोंदिया शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. तीन ते चार महिन्यापूर्वी ८० ते ते १०० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो सध्या ५ रुपये किलो दराने विकला जात आहे. काही ठिकाणी तर दीड किलोपर्यंत टोमॅटो १० रुपयांना विकला जात आहे. घाऊक बाजारात दीड ते अडीच रुपये तर चिल्लरमध्ये आठ ते दहा रुपये दराने विक्री केली जात होती. या मुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च भागवणे कठीण झाले होते. धान पाठोपाठ गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आता पालेभाज्यांची ही सर्वाधिक उत्पादन करतात. त्यामुळे त्यांना दैनंदिन खर्चासाठी रोख रक्कम उपलब्ध होते. बहुतांश ठिकाणी सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असल्याने जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. जिल्ह्यातील भाजीपाला जवळच्या बाजारपेठेत वापरला जातो आणि इतर शहरांमध्ये ही पाठविला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा