गोंदिया : तिरोडा तालुक्यातील चोरखमारा शेतशिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेली महिला व तिच्या पतीचा नाल्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज, १९ एप्रिलला सकाळी १२.०० वाजता सुमारासची आहे. मुनेश्वर श्रीराम कुंभरे (४२) व सरिता मुनेश्वर कुंभरे (३५) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. या घटने चोरखमारा शेतशिवारात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
चोरखमारा येथील सरीता मुनेश्वर कुंभरे (३५) ही नेहमीप्रमाणे शेळ्या घेऊन शेतशिवाराकडे गेली होती. चोरखमारा जलाशयाला लागून असलेल्या तलावाजवळ शेळ्या गेल्या असताना त्यांना हाकलून लावण्यासाठी सरीता नाल्याजवळ गेली. शेळ्या हाकलत असताना पाय घसरून तिचा तोल गेला. दरम्यान, ही बाब नाल्याच्या दुसऱ्या बाजुला असलेल्या एका महिलेच्या लक्षात आली. त्या महिलेने मदतीसाठी आरडाओरड केली. यावर जवळच शेतात काम करीत असलेल्या पती मुनेश्वर कुंभरे हे घटनास्थळी धावून आले. पत्नी पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यांनी पत्नीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली.
हेही वाचा…भंडारा : ‘या’ गावातील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार, जाणून घ्या कारण…
परंतु, दोघांनाही जीव वाचविता आले नाही. या घटनेची माहिती लागताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तिरोडा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद तिरोडा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सपोनि बाबासाहेब सरबदे करीत आहेत. या घटनेने चोरखमारा गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा…नीलम गोऱ्हे म्हणतात,‘आंबेडकरी चळवळ संपविण्याचं काम…’
मुनेश्वर श्रीराम कुंभरे व सरिता मुनेश्वर कुंभरे या दाम्पत्यांना प्रणाली कुंभरे नावाची ९ वर्षीय एकुलती एक मुलगी आहे. चोरखमारा येथील अप्रिय घटनेत मुनेश्वर कुंभरे व सरीता कुंभरे या दोघांचा मृत्यू झाल्याने प्रणाली हिच्या डोक्यावरून आई-वडिलाचे छत्र हरपले आहे. मृतकाच्या मागे मुनेश्वर यांची आई व मुलगी प्रणाली असा आप्त परिवार आहे.