गोंदिया : अकोला येथील योगेंद्र यादव यांच्या सभेत झालेला गोंधळ म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि आयोजकांनी आपसात केलेली हाणामारी आहे. यात त्यांच्याच एका अन्सारी कुरेशी नावाच्या कार्यकर्त्याच्या नाकाचे हाड मोडले असून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या प्रकरणात यादव यांच्या कुणाही कार्यकर्त्याला काही काहीही इजा झाली नाही. त्यामुळे त्यांनी केलेली टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असेच म्हणावे लागेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील जाहीर सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाची बाजू मांडली. ‘हा आमच्यावर नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर हल्ला आहे,’ अशी टीका ‘भारत जोडो’ अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी अकोल्यात केली होती. तसेच ‘वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला असेल तर त्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर लाजिरवाणी वेळ आणली,’ असे देखील ते म्हणाले होते. यावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा : अमरावती : रागातून उद्भवला वाद; मुलाने लोखंडी बत्त्याने वडिलांच्या डोक्यावर…

उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील

तत्पूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठका सुरू असल्याचा गौप्यस्फोट केला. निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार आहे, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे लोकशाहीवादी आणि मुस्लीम समाजाने यांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि त्यांना मतदान करू नये. कारण येणाऱ्या दिवसात उद्धव ठाकरे हे भाजपबरोबर जातील, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याकडून लिहून घ्या की ते पुढचे पाच वर्ष तुमच्यासोबत राहतील, असे मुस्लीम समाजाकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसला सांगितले जात आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिमांना कशा पद्धतीने आश्वासन देते, हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सतीश बनसोड, राजू राहुलकर, विनोद मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे अर्जुनी मोरगावचे उमेदवार दिनेश पंचभाई आदी उपस्थित होते.