Gondia Crime News: गोंदिया शहरात गेल्या तीन चार महिन्यांपासून क्षुल्लक कारणावरून होणारे हत्यांचे सत्र काही थांबता थांबत नाही. असेच एक प्रकरण गुरुवारी रात्री छोटा गोंदिया येथील चिचबन मोहल्ला येथे घडले. क्षुल्लक कारणाने मनात राग धरून असलेल्या एक तरुण आणि दोन विधी संघर्षात बालकांनी एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केली.
सदर घटना २२ ऑगस्ट गुरुवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास घडली. विकी फर्कुंडे राहणार छोटा गोंदिया असे या घटनेतील मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार विकी फर्कुंडे हा काही दिवसांपूर्वी गोंदिया येथील एन. डी. टेक्सटाईल या खासगी दुकानात कामाला लागला होता आणि तो दररोज कामावरून रात्री साडेदहाच्या सुमारास घरी परत यायचा. ही बाब आरोपींनी हेरून त्यांनी गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास चीचबन मोहल्ला येथे विकी फरकुंडे याला घेरले आणि त्यावर धारदार शस्त्राने तीनही आरोपींनी वार केल्यामुळे त्याच्या जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश लब्दे आपल्या पथकासह पोहचले आणि मृतदेह जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेतील तीनही आरोपी हे मृतक विकी फरकुंडे याच्या घराशेजारी जुगार खेळायचे, गांजा ओढायचे आणि जुगार खेळताना अश्लील शिवीगाळ करायचे. याकरिता त्यांना मृतकाच्या आईने हटकले होते. तरीपण आरोपींचे सदर कृत्य तसेच सुरू होते याबाबतची माहिती मृतक विकी फरकुंडे याच्या आईने त्याला दिली असता मृतक विकी फडकुंडे यांनी सदर मुलांना आधी समज दिली व यापुढे माझ्या घराशेजारी जुगार खेळायचा नाही, गांजा ओढायचा नाही अशी तंबी दिली होती . त्यावर ही मुले ऐकत नसल्यामुळे आरोपी मुलांपैकी दोघांना विक्की फडकुंडे यांनी काही दिवसांपूर्वी दोन चार थपडा लगावल्या होत्या. त्या बाबीचा राग मनात धरून सदर आरोपींनी गुरुवारी रात्री विकी फडकुंडे याला दुकानातून परत येताना चिचबन मोहल्ला छोटा गोंदिया येथे घेरले आणि त्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली.
हेही वाचा : Maharashtra Rain News: राज्यात गेल्या अडीच महिन्यांत पाऊस नेमका किती ? हवामान विभाग काय म्हणतोय…
या हत्येची बातमी गोंदिया शहर पोलिसांना मिळताच पोलीस पथक आरोपींच्या शोधा करिता रात्रभर फिरून या घटनेतील सहभागी लकी सुनील मेश्राम (वय १८ ) आणि दोन विधी संघर्ष अशा तिन्ही आरोपींना शुक्रवारी पहाटे तीन वाजता अटक केली आहे. गोंदिया शहरात गेल्या तीन ते चार महिन्यात होणारी ही हत्येची सातवी घटना आहे. यापूर्वी गोंदिया शहरात विविध कारणाने गोलू तिवारी, महेश दखने, बिसेन, उज्जवल निशांत मेश्राम, प्रज्वल मेश्राम, मनीष भालाधरे विक्की फरकुंडे यांची हत्या झालेली आहे. हे विशेष.