Gondia Elephant News: मुसळधार पावसाने विदर्भात ठाण मांडले आहे. शेतशिवारातील कामावर त्याचा परिणाम झाला आहे, पण पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही. त्यातच आता गावात हत्ती दिसल्याने गावकरी मात्र पुरते हादरले आहेत. ही गोष्ट आहे विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना हत्तीचे नवे संकट गावकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील नवेगाव बांध परिसरात जंगली हत्तीचा प्रवेश झाल्याची वार्ता पसरली आहे. नवेगाव बांध म्हणजे सारस पक्ष्यांचा हक्काचा अधिवास. राज्यातील सारस एकमेव गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात शिल्लक आहे. वनमहर्षी मारुती चित्तमपल्ली यांच्यामुळे नवेगाव बांधची ओळख समोर आली आहे. मात्र, हत्तीच्या आगमनाच्या वार्तेने नवेगावबांध व परिसरात एकच खळबळ माजली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून आसाममधून आलेल्या हत्तीच्या कळपाने गडचिरोली परिसरात ठाण मांडले आहे. हे हत्ती बरेचदा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात देखील दिसून आले आहेत. मात्र, त्यांचा मुक्काम गडचिरोली जिल्ह्यातच असून वनखाते त्यावर लक्ष ठेवून आहे. या हत्तींमुळे गावकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात हत्तीने धुमाकूळ घातल्याने आता गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध परिसरातील नागरिक “हत्ती आला रे आला” म्हणत धास्तावले आहेत. पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हत्तीच्या कळपाने याआधी देखील शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये अधिक भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा : एका प्रशिक्षणासाठी २७६ कोटींचे कंत्राट! एकाच संस्थेला २३ हजार जागांच्या मंजुरीवर प्रश्नचिन्ह
गेल्या तीन-चार वर्षापासून हत्तींचा सुळसुळाट या परिसरात व तालुक्यात होत आहे. शेतीचे प्रचंड नुकसान या हत्तींच्या कळपांनी यापूर्वीही केलेले आहे. त्यानंतर हत्ती येथे आढळून आले नाही आणि त्यांचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात दिसायला लागला. आता पुन्हा एकदा एकच हत्ती दिसल्याची वार्ता आहे. हा एकच हत्ती भटकलेला आहे की हत्तीच्या कळप आहे, याबाबत अजून पुरेशी माहिती नाही. तो कुणाला दिसला हे देखील अजून समोर आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सर्व काही निसर्गाने नेले, आता हत्तीचे कळप शेतात असलेल्या उभ्या पिकाचे नुकसान करणार,यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पुरानंतर हत्तीच्या कळपांची एक नवीनच दहशत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. नवेगावबांध परिसरातील डेपो, ओव्हर फ्लो कडील टोली वसाहत परिसरात हत्ती आल्याची माहिती आहे. हत्ती नवेगावबांध हेलिपॅड ग्राउंड मार्गे पलटूदेव पहाडी कडील शेतातून कापगते यांच्या ऊसवाडी कडून जंगलात गेल्याचे वनविभागाच्या सूत्रानी सांगीतले. गावातील लोकांना सतर्क राहावे तसेच शेतात जातांनी गटागटांमध्ये सावधरित्या जावे, हत्तीच्या जवळ जाऊ नये त्याला चिथावण्याचा प्रयत्न करू नये, हत्ती बिथरतील असे कुठलेही कृत्य नागरिकांनी करू नये. असा इशारा वनविभाग व स्थानिक महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात आला आहे.