Gondia Elephant News: मुसळधार पावसाने विदर्भात ठाण मांडले आहे. शेतशिवारातील कामावर त्याचा परिणाम झाला आहे, पण पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही. त्यातच आता गावात हत्ती दिसल्याने गावकरी मात्र पुरते हादरले आहेत. ही गोष्ट आहे विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना हत्तीचे नवे संकट गावकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील नवेगाव बांध परिसरात जंगली हत्तीचा प्रवेश झाल्याची वार्ता पसरली आहे. नवेगाव बांध म्हणजे सारस पक्ष्यांचा हक्काचा अधिवास. राज्यातील सारस एकमेव गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात शिल्लक आहे. वनमहर्षी मारुती चित्तमपल्ली यांच्यामुळे नवेगाव बांधची ओळख समोर आली आहे. मात्र, हत्तीच्या आगमनाच्या वार्तेने नवेगावबांध व परिसरात एकच खळबळ माजली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून आसाममधून आलेल्या हत्तीच्या कळपाने गडचिरोली परिसरात ठाण मांडले आहे. हे हत्ती बरेचदा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात देखील दिसून आले आहेत. मात्र, त्यांचा मुक्काम गडचिरोली जिल्ह्यातच असून वनखाते त्यावर लक्ष ठेवून आहे. या हत्तींमुळे गावकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात हत्तीने धुमाकूळ घातल्याने आता गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध परिसरातील नागरिक “हत्ती आला रे आला” म्हणत धास्तावले आहेत. पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हत्तीच्या कळपाने याआधी देखील शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये अधिक भीती निर्माण झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा