सरकारलाच झाले वीज बिलाचे ओझे
राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगर पालिका, महापालिकांच्या शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांनाही ४.८० रुपये प्रती युनिट इतक्या स्वस्त दरात वीज देण्याचा निर्णय राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. दरम्यान, खासगी महाविद्यालयांनाही याच दराने वीज देण्यासंदर्भात राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.
वीज दरात झालेली भरमसाठ वाढ हा सर्वसामान्यांसाठी अतिशय चिंतेचा विषय आहे. त्यामुळे तर उद्योग महाराष्ट्राऐवजी छत्तीसगडची वाट धरत आहेत. बहुतांश वेळी तर शासकीय कार्यालयातील वीज बिल भरले नाही म्हणून महावितरणचे अधिकारी पुरवठाच बंद करतात. वीज बिलावर सर्वत्र ओरड सुरू असतांनाच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगर पालिका, महापालिकांच्या शाळा, महाविद्यालयांना अवघ्या ४.८० प्रती युनिट पैसे दराने वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ शाळाच नाही, तर जिल्हा परिषदेचे ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयांनाही याच दराने वीज पुरवठा केला जाणार आहे. कारण, शासनालाही महिन्याला वीज बिलाचे लाखो रुपयांचे बिल भरणे कठीण झालेले आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कालपर्यंत या सर्वाना ७ रुपये प्रतियुनिट या दराने वीज पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे नगर पालिका, नगर पंचायत, महापालिकांच्या शाळांचे बिल हजाराच्या घरात येत होते. आता ७ रुपये युनिटवरून थेट २ रुपये २० पैसे कमी केल्याने या शाळांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे नुकतेच चंद्रपूरला दौऱ्यावर आले असता स्थानिक महापौर राखी कंचर्लावार यांच्यासह जिल्ह्य़ातील काही बडय़ा नेत्यांनी किमान महापालिका व नगरपालिकांना विजेचे दर कमी करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली होती. या मागणीचा ऊर्जामंत्र्यांनी गांभीर्याने विचार केला. त्यानंतरच त्यांनी राज्यभरातील सर्व शासकीय शाळा व महाविद्यालयांसोबत रुग्णालयांनाही ४.८० रुपये प्रतियुनिट वीज दर आकरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शाळा व रुग्णलयांना दिलासा मिळाला आहे. हा निर्णय होताच तिकडे राज्यातील खासगी शाळा व महाविद्यालयांच्या संस्थाचालकांनी खासगी शाळा व महाविद्यालयांनाही याच दराने वीज आकारण्याची मागणी लावून धरली आहे. यावरही शासन गांभीर्याने विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, उद्योगांनाही वीज कमी दरात मिळावी यासाठी ऊर्जा खाते विचार करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात खासगी संस्था व उद्योगांनाही प्रति युनिटचे दर कमी होऊ शकतात.