भंडारा : गावातील झुडुपात वाघोबा शांत बसलेला होता. तोच त्या दिशेने जाणाऱ्या काही जणांना तो दिसला. एरवी वाघाचे दर्शन होताच बोबडी वळते मात्र इथे या अतिउत्साही लोकांनी चक्क वाघाबोलाच घेरले आणि खचाखच त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढायला सुरवात केली.फोटो ‘क्लीक’च्या किंवा लोकांच्या आवाजाने वाघ चवताळून उठेल असे वाटत असताना वाघोबा मात्र चांगल्या ‘मूड’ मध्ये असल्याने त्यानेही लोकांना मनमुराद फोटो आणि व्हिडिओ काढू दिलेत. काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वाघाला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली.
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ वनविभाग अंतर्गत येणाऱ्या खंभाडी- कोतुर्ली गावात दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन होताच ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षात भला मोठा वाघ पाहिल्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला घेरले आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार व्हायरल झाल्यानंतर वाघाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. मात्र हा सर्व प्रकार घडत असताना अड्याळ वन परिक्षेत्राचे अधिकारी विवेक येवतकर आणि वन विभागाचे इतर कर्मचारी घटनास्थळानी उपस्थित नव्हते.
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ वनविभाग अंतर्गत येणाऱ्या खंभाडी- कोतुर्ली गावात दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन होताच ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षात भला मोठा वाघ पाहिल्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला घेरले, फोटो-व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. वनविभागाचे पथक दोन तास उशिरा पोहचले. pic.twitter.com/YkUTYoqyuD
— LoksattaLive (@LoksattaLive) December 12, 2024
हेही वाचा…‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या वाघाने शेळ्या आणि गुरांची शिकार केली होती. त्यामुळे तो झुडपात सुस्तावलेल्या अवस्थेत होता. या वाघाला पाहण्यासाठी घटनास्थळी सुमारे तीनशे लोक जमले होते. लोकांनी दुपारी २ वाजतापासूनच गर्दी केली होती मात्र वनविभागाचे पथक तब्बल दोन तास उशिरा पोहचले. वनविभाग उशिरा पोहोचल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले.
प्रत्यक्षदर्शी अभियंता मोईन खान यांनी सांगितले की,आम्ही दुपारी २ वाजता तेथे पोहोचलो, तर लोक वाघाच्या अगदी जवळ जाऊन फोटो व्हिडिओ काढत होते. मात्र वन विभागाचे एकही अधिकारी कर्मचारी तेथे नव्हते. त्यामुळे वाघाच्या जवळ येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लोक वाघाच्या अवघ्या १० फूट अंतरापर्यंत पोहोचल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसत होते. अशा स्थितीत वाघही हल्ला करू शकला असता. हे फार गंभीर आहे. वनरक्षक नीलेश श्रीरामे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नर वाघ असून एक लहान बछडा होता. त्याने आधी बकरी आणि नंतर वासराची शिकार केली होती. सायंकाळी ७ वाजता नंतर वाघ त्या परिसरातून निघून गेला. सध्यातरी धोका टळला आहे. वाघाच्या आजूबाजूचा परिसर संवेदनशील असल्याने सावध राहण्याची गरज असल्याचे वनविभागाने लोकांना बजावले आहे.
हेही वाचा…‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
त्वरित कळवा…
बहुउद्देशीय संस्थेचे अजहर हुसेन यांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी समूहाने बाहेर जावे, वाघाच्या जवळ जाणे टाळावे, वाघ पाहिल्यानंतर तातडीने वनविभाग, पोलीस व स्वयंसेवी संस्थांना सूचना द्यावी.
प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह
या घटनेने वनविभागाची तयारी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. केवळ वाघाच्या सुरक्षेसाठीच नव्हे तर अशा घटनांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने त्वरित प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी वनविभागाला आता या दिशेने योग्य ती पावले उचलावी लागणार आहेत.