नागपूर : वाढलेल्या गुन्हेगारीमुळे नागपूर शहर सध्या ओळखले जात आहे. खुनाच्या घटनांमुळे जनमानसात भय आहे.आता ग्रामीण भागात ही लुटमारीच्या घटना घडू लागल्या आहेत. सराफा व्यापाऱ्यांना धमकावणे, खंडणी मागणे आणि अन्य प्रकारचा त्रास देण्याचे प्रकार सुरु होते. नुकताच खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा डाकबंगला गावातील सराफा व्यापारी पुतण्यासह कारने घरी जाताना चार दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करुन किलोभर सोन्यासह १ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली.
कोराडीतील नांदा गावात राहणारे रवी मुसळे यांचे पिपळा डाकबंगला येथे बाजार चौकात निहारिका ज्वेलर्स नावाने सोन्याचांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. बुधवारी रात्री पाऊस असल्यामुळे रवी मुसळे यांनी दुकान बंद केले. पुतण्या मयंक मुसळेसह रवी यांनी घराकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने एका पिशवीत ठेवले. रवी शटर बंद करीत असताना मयंकने बॅग कारमध्ये ठेवली. दोघेही कारमध्ये बसले आणि तेवढ्याच अचानक चार दरोडेखोर आले. त्यांनी रवी यांना पकडून मारहाण केली आणि मयंकने प्रतिकार करताच त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने गोळी हवेत उडाली. त्यानंतर मयंकच्या डोक्यावर पिस्तुलच्या मुठीने हल्ला केला. त्यात मयंक जखमी झाला.
दोघांनाही कारमधून बाहेर फेकून आरोपींनी कारसह १ किलो सोन्याचे दागिने, १५ किलो चांदी आणि एक लाख २५ हजार रुपये रोख असा एकुण १ कोटी १५ लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. दरोडा घातल्यानंतर आरोपींनी नागपूरच्या दिशेने पळ काढला. पाटणसावंगी-बैलवाडा परिसरात आरोपींनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली आणि दुसऱ्या कारने पळ काढला. गुरुवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या नेतृत्वातील पथकाने आरोपींनी पळवलेली कार जप्त केली.
नागपूर ग्रामीणमध्ये वाढले ‘पिस्तूलबाज’
नागपूर ग्रामीणमध्ये पिस्तुलाचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली असून मध्यप्रदेश-शिवनीमधून गावठी कट्टे नागपुरात येत असल्याची माहिती आहे. ग्रामीण पोलिसांनी गेल्या दोनच दिवसांपूर्वी केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालई गावातून एक पिस्तूल, उमरी बसस्थानक परिसरातून एक पिस्तूल, बिहाडा फाटा परिसरातून एक पिस्तूल आणि खापरखेड्यातील पिपळा येथून एक पिस्तूल अशा एकूण ४ पिस्तूल आणि १० जीवंत काडतूस जप्त केले. बुधवारीसुद्धा सराफा दुकानदारांना लुटण्यासाठी आरोपींनी पिस्तुलचा वापर केला. यावरुन ग्रामीणमध्ये पिस्तुलांचा वापर वाढल्याचे दिसते.