नागपूर : केंद्र सरकारने २०२१ मध्ये जुनी वाहने स्क्रॅप करणारे धोरण आणले. त्यानुसार राज्यात एकूण १२ नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्र लवकच सुरू होणार आहेत. त्यापैकी नागपुरात तिसऱ्या केंद्राचा शुभारंभ परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते झाला.
नागपुरातील ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड (एएमपीएल)च्या नवीन केंद्राच्या गुरूवारच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भिमनवार म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रदूषण, वाहनांची वाढती संख्या बघत हे धोरण तयार केले. त्यानुसार सध्या जालना व नागपुरात एक केंद्र सुरू होते.
हेही वाचा : Amravati update : आधी दुचाकीने धडक, नंतर चाकूने भोसकून हत्या…
परंतु येथे वाहनांसह इतरही भंगार साहित्य स्क्रॅप होत होते. आता या केंद्रात फक्त जुनी वाहने स्क्रॅप होणार आहेत. त्यामुळे फक्त जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगचे हे राज्यातील पहिले केंद्र आहे.
सध्या सरकारी वाहने १५ वर्षांहून जास्त काळ वापरता येत नाहीत. खासगी व व्यावसायिक वाहनांबाबतही नियम आहे. एका विशिष्ट कालावधीनंतर या वाहनांना हरित कर भरावा लागतो. या पद्धतीच्या नोंदणीकृत केंद्रात वाहन स्क्रॅप केल्यास वाहनधारकाला प्रतिकिलो रक्कम दिली जाईल. सोबत वाहन स्क्रॅपिंगच्या प्रमाणपत्रावर नवीन वाहने खरेदी करताना १० टक्के करात सवलत असेल, असेही भिमनवार म्हणाले.
सध्या तीन केंद्र सुरू झाले असून महेंद्रा, टाटासह इतरही सुमारे ९ संस्थांकडून या केंद्रासाठी अर्ज आले आहेत. त्यालाही लवकरच मंजुरी दिली जाणार असल्याचे भिमनवार यांनी सांगितले. याप्रसंगी एएमपीएलचे भरत सांघवी, सचिन सांघवी यांच्यासह दिनेशचंद्र उपाध्याय, आशीष काळे, कुमार जितेंद्र सिंग उपस्थित होते.
सरकारची निम्मी वाहने स्क्रॅप
राज्यात विविध सरकारी विभागांकडे १५ वर्षांहून जास्त कालावधीची १० हजार वाहने असल्याचे परिवहन खात्याच्या निदर्शनात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ४ हजार ६०० वाहने स्क्रॅप करण्यात आली. इतर वाहने लवकरच स्क्रॅप करण्यात येणार आहेत. खासगी वाहनांसाठीच्या धोरणानुसार ३ कोटी वाहने असण्याचा अंदाज आहे. त्यापैकी बरीच वाहने वापरातून बाद झाली असण्याची शक्यता आहे, असेही भिमनवार म्हणाले.
समृद्धी महामार्गावर लवकरच ‘आयटीएमएस’
समृद्धी महामार्गावर लवकरच आयटीएमएस ही सीसीटीव्ही कॅमेरा असलेली स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. यासोबतच परिवहन खात्याने व्यावसायीक बसचालकांची ब्रेथ तपासणी, टायर तपासणी, संमोहन होऊ नये म्हणून केलेल्या उपायांमुळे गेल्यावर्षीहून अपघात कमी झाले आहेत. जास्त गतीने वाहन चालवणाऱ्या २५ हजार वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आले, अशी माहितीही भिमनवार यांनी दिली.