नागपूर : राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी असलेले पोलीसच असुरक्षित असल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यभरात पोलिसांवरील हल्ल्याच्या २ हजार ४१० घटना घडल्या आहेत. यात सर्वाधिक घटना हा मुंबई आणि ठाण्यात घडल्या असून वाढत्या घटनांमुळे पोलिसांना स्वत:चेच संरक्षण करण्याची वेळ आली आहे.

चंद्रपूर पोलीस दलात कार्यरत दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर अलीकडेच हल्ला झाला. यात एकाचा मृत्यू झाल्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुन्हेगार, राजकीय वरदहस्त असलेले (पान २ वर) (पान १ वरून) कार्यकर्ते, अवैध धंदे करणारे आणि अवैध धंद्यांना खतपाणी घालणारे लोक कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांसमोर अडथळे निर्माण करतात. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा धीर अशा घटनांमुळे खचण्याचा धोका असतो. पोलीस महासंचालकांनी पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतरही हे प्रकार थांबले नसल्याचे चंद्रपूरच्या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे. राज्यात गेल्या तीन वर्षांत पोलिसांवर हल्ल्याच्या २ हजार ४१० घटना घडल्या असून यात सर्वाधिक ४४८ प्रकार हे मुंबईतील आहेत. त्याखालोखाल आयुक्तालयांमध्ये ठाणे (१६१) आणि पिंपरी-चिंचवड (१०८) या शहरांचा क्रमांक आहे. याखेरीज पुणे (९९), नागपूर (६२), नवी मुंबई (६९), वसई-विरार (६४), छत्रपती संभाजीनगरात (५९) हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिक आणि सोलापुरात प्रत्येकी २७ आणि अमरावतीमध्ये पोलिसांवर हल्ल्याची ३० प्रकरणे घडली आहेत.

पोलिसांनी सामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे. ‘कम्युनिटी पोलिसिंग’वर भर द्यावा. कर्तव्य बजावताना कुणाच्याही दबावाखाली चुकीचा निर्णय घेऊ नये. हल्ला झाल्यास पोलिसांनी त्वरित वरिष्ठांना कळवून तक्रार दाखल करावी. – डॉ. भूषणकुमार उपाध्याय, माजी पोलीस महासंचालक

हल्ल्यांमध्ये घट पण…

राज्यात २०२२मध्ये पोलिसांवर हल्ल्याच्या तब्बल ८९६ घटना घडल्या होत्या. २०२३ मध्ये ८०१ प्रकरणे समोर आली. गतवर्षी, २०२४मध्ये यात काहीशी घट झाली व पोलिसांना लक्ष्य केल्याचे ७१३ गुन्हे नोंदविले गेले. वर्षागणिक हे प्रमाण घटले असले, तरी परिस्थिती फारशी नियंत्रणात आलेली नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

ग्रामीण महाराष्ट्रात ३१२ घटना

राज्याच्या ग्रामीण भागात पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षांत कोल्हापूर परिक्षेत्रात (पाच जिल्ह्यांचा समावेश) पोलिसांवरील हल्ल्याच्या ३१२ घटना घडल्या. यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ९१ घटना घडल्या. दुसऱ्या स्थानावर नाशिक परिक्षेत्र (२०२) असून अहिल्यानगरात सर्वाधिक (९५) गुन्हे दाखल झाले. अमरावती परिक्षेत्र (१५५) तिसऱ्या स्थानी असून यात बुलढाण्यात सर्वाधिक ४२ गुन्हे दाखल झाले. त्याखालोखाल हल्ल्याच्या घटना छत्रपती संभाजीनगरात (१५२) असून या परिक्षेत्रात जालना जिल्ह्यात सर्वाधिक ५० गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Story img Loader