नागपूर : राज्यातील काही भागात उन्हाचा प्रकोप कायम असून यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताची रुग्णसंख्या ३१८ वर पोहचली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे नाशिक, जालना, नागपुरात नोंदवले गेले.
राज्यात १ मार्च २०२४ ते ५ जून २०२४ दरम्यानच्या काळात उष्माघाताचे एकूण ३१८ रुग्ण आढळले. त्यापैकी सर्वाधिक ३१ रुग्ण नाशिक जिल्ह्यात, २८ रुग्ण जालन्यात, २६ रुग्ण नागपुरात आढळले. बुलढाणा जिल्ह्यात २३ रुग्ण, धुळे येथे २० रुग्ण, गडचिरोलीत २० रुग्ण, कोल्हापूरात ११ रुग्ण, नांदेडमध्ये १७ रुग्ण, उस्मानाबादमध्ये १० रुग्ण, परभणीत १२ रुग्ण, सिंधुदुर्गमध्ये १० रुग्ण, सोलापूरमध्ये १९ रुग्णांची नोंद झाली. गोंदिया, पुणे, ठाणे या तीनही जिल्ह्यात प्रत्येकी ८ रुग्ण तर चंद्रपूर, सातारा, वर्धा, यवतमाळमध्ये प्रत्येकी ७ रुग्ण आढळले. अकोल्यात ६ रुग्ण तर जळगावमध्ये ५ रुग्ण आढळले. अमरावती, भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी ४ रुग्ण तर बृहन्मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद, वाशीम जिल्ह्यात प्रत्येकी ३ रुग्ण आढळले. बीड, रायगड जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर हिंगोली, पालघर, रत्नागिरी, सांगली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्णाची नोंद झाली. या आकडेवारीला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयानेही दुजोरा दिला.
हेही वाचा…लोकजागर: पूरनियंत्रणाचा ‘पोरखेळ’!
भंडारा जिल्ह्यात पहिल्या मृत्यूची नोंद
राज्यात उष्माघाताच्या पहिल्या मृत्यूची नोंद भंडारा जिल्ह्यात झाली. या मृत्यूवर उष्माघात विश्लेषण समितीनेही शिक्कामोर्तब केले आहे. भंडाऱ्यात यंदाच्या उन्हाळ्यात केवळ ४ रुग्ण नोंदवले गेले, हे विशेष.
२०२३ मध्ये दीड महिन्यात ३७३ रुग्णांची नोंद
राज्यात १ मार्च २०२३ ते १२ एप्रिल २०२३ दरम्यानच्या काळात उष्माघाताच्या ३७३ रुग्णांची नोंद करण्यात आली. परंतु एकही मृत्यू नोंदवला गेला नाही. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात उष्माघाताचे रुग्ण कमी दिसत आहेत.
उष्माघातामुळे होणारा त्रास
मनुष्याचे शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६.४ ते ३७.२ अंश सेल्सियस असते. बाहेर अथवा घरात तापमान अचानक वाढल्यास उष्णतेशी निगडित आजार होतात. त्यात शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे आणि उष्माघात असा त्रास होतो. उष्माघातामुळे हृदयविकारासह श्वसनविकार आणि मूत्रपिंडविकाराचा धोका निर्माण होतो.
हेही वाचा…नागपूर : अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ रस्त्यावर फेकले
सर्व शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्ष
नागपूर जिल्यातील वैद्यकीय शिक्षण, नागपूर महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू आहेत. येथे रुग्णांसाठी कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, औषधोपचारासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध आहेत. उष्माघाताबाबत जनजागृती केली जात आहे. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.