नागपूर : गृहमंत्रालयाने खुल्या कारागृहात कैद्यांचे स्थानांतरण व्हावे यासाठी निकषांत बदल केले आहेत. या निर्णयामुळे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचे स्थानांतर खुल्या कारागृहात होत आहे. पर्यायाने मध्यवर्ती कारागृहातील गर्दीवर नियंत्रण मिळाल्याने प्रशासनावरील भार कमी झाला आहे.

राज्यभरातील ६० कारागृहात जवळपास ४० हजारांपेक्षा जास्त कैदी बंदिस्त आहेत. दिवसेंदिवस राज्यभरातील कारागृहात कच्च्या कैद्यांची आणि शिक्षाधीन कैद्यांची संख्या वाढत आहेत. काही जिल्ह्यातील कारागृहात दुपटीपेक्षा जास्त कैदी आहेत. त्यामुळे अनेकदा कारागृहात कैद्यांनी एकमेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. कारागृहातील कैदी कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध उपक्रम राबवित आहेत. त्यात आर्थिक स्थितीने कमकुवत असलेल्या कैद्यांची जामिनाची रक्कम केंद्र सरकार भरणार असून अशा अनेक कैद्यांना कारागृहाबाहेर काढण्यात येत आहे. तसेच अन्य उपाय म्हणून ज्या कैद्यांची वर्तवणूक सकारात्मक आहे किंवा कैद्याच्या स्वभावात आमुलाग्र बदल झाला आहे, अशा कैद्यांना खुल्या कारागृहात पाठविण्याचा निर्णय कारागृहातील समिती घेते.

सध्या राज्यात मोर्शी, पैठण, विसापूर, गडचिरोली आणि येरवडा येथेच खुले कारागृह आहे. या कारागृहांत सध्या ५०० ते ७०० खुले कैदी आहेत. तसेच नागपूर, अमरावती, अकोला, धुळे,नाशिक, यवतमाळ. पुणे, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर शहरात अर्धखुले कारागृह आहेत. मात्र, येथे स्वतंत्र आस्थापना नसल्यामुळे येथील कारभार वा-यावर असल्याची माहिती समोर आली आहे.

काय झाला निकषात बदल

कारागृहात शिक्षाधीन कैदी म्हणून जुन्या नियमानुसार तब्बल ९ वर्षांचा कालावधी घालविल्यानंतर त्याला खुल्या कारागृहात पाठविण्याचा प्रस्ताव होता. त्यातही त्या कैद्याची कारागृहातील वागणूक आणि स्वभाव याचा गांभीर्याने विचार करण्यात येत होता. सहकारी कैद्यांसोबत असलेली वर्तवणुकीचेसुद्धा यामध्ये मूल्यांकन करण्यात येत होते. मात्र, निकषांमध्ये बदल केल्यानंतर आता न्यायाधीन बंदी म्हणून चार वर्षे आणि शिक्षाधीन कैदी म्हणून किमान एक वर्षे अशी एकून पाच वर्षे कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांचा समावेश खुल्या कारागृहात करण्यात येत आहे. त्यामुळे आता मध्यवर्ती कारागृह आणि जिल्हा कारागृहातील गर्दी कमी होत आहे.

शेतीसह अन्य पर्यायाची गरज

खुल्या कारागृहात फक्त शेती व्यवसाय करण्यात येतो. मात्र, खुल्या कारागृहांमध्ये सर्वाधिक कैदी नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, मुंबई, ठाणे अशा शहरातून येतात. शहरात राहणाऱ्या कैद्यांना शेती कसण्याबाबत पुरेसी माहिती नसते. त्यामुळे शहरी भागातील कैदी केवळ बसून राहतात. त्यामुळे कैद्यांना प्रशिक्षण देणे किंवा शेतीव्यतिरिक्त अन्य पर्यायाची व्यवस्था करण्याची गरज आहे.

” कैद्यांच्या वागणुकीत सुधारणा आणि स्वभावात बदल यावर कारागृह कटाक्षाने लक्ष देते. कैद्यांचे वर्तन सुधारुन तो समाजात पुनर्स्थापन होण्यास सक्षम झाल्यानंतर त्याला खुल्या कारागृहात मोकळा श्वास घेऊन उर्वरित शिक्षा भोगण्याची सकारात्मक संधी देण्यात येते.”

डॉ. जालिंदर सुपेकर (विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य कारागृह विभाग)