नागपूर : राज्यात मागच्या आठवड्यापर्यंत विजेची मागणी २३ हजार मेगावाॅट होती. परंतु काही भागात पावसाचा जोर वाढल्याने ही मागणी शुक्रवारी दुपारी २.३० वाजता केवळ २१ हजार मेगावाॅटपर्यंत खाली आली.
राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात विजेची मागणी २९ ते ३० हजार मेगावाॅट होती. त्यानंतर काही भागात पाऊस झाल्याने ही मागणी १० जूनला २३ हजार मेगावाॅटपर्यंत खाली आली. मागच्या आठवड्यापर्यंत विजेची २३ हजार मेगावाॅटच्या जवळपास होती. परंतु आता राज्यातील आणखी काही भागात पावसाचा जोर वाढल्याने मागणी घटली असून शुक्रवारी (१२ जुलै) २१ हजार २५० मेगावाॅटपर्यंत खाली आली आहे.
हेही वाचा : काँग्रेसचा चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघांवर दावा, आघाडीत बिघाडीची…
शुक्रवारी महावितरणकडे १८ हजार ९५ मेगावाॅट आणि मुंबईसाठी ३ हजार १५४ मेगावाॅट मागणी नोंदवण्यात आली. मागणीच्या तुलनेत विविध शासकीय व खासगी प्रकल्पातून राज्याला १४ हजार ३४८ मेगावाॅट वीज मिळत होती. विजेच्या मागणीत मोठी घट झाल्याने महानिर्मितीसह खासगी कंपन्यांना काही वीजनिर्मिती संच बंद ठेवावे लागले.
विजेची उपलब्धता
राज्याला १२ जुलैला दुपारी २.३० वाजता सर्वाधिक ५ हजार ७५ मेगावाॅट वीज महानिर्मितीकडून मिळत होती. त्यापैकी ४ हजार ७६९ मेगावाॅट औष्णिक प्रकल्पातून, २५५ मेगावाॅट उरण गॅस प्रकल्पातून, ४९ मेगावाॅट सौर ऊर्जेतून मिळाली. खासगी प्रकल्पांपैकी अदानीकडून १ हजार ८०८ मेगावाॅट, जिंदलकडून ७३८ मेगावाॅट, आयडियलकडून १७२ मेगावाॅट, रतन इंडियाकडून १ हजार ३७ मेगावाॅट, एसडब्ल्यूपीएलकडून ४५४ मेगावाॅट वीज राज्याला मिळत होती. केंद्राच्या वाट्यातूनही राज्याला ६ हजार ३८३ मेगावाॅट वीज मिळत होती.
हेही वाचा : चंद्रपूर: सरकारी आणि वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमण काढा; न्यायालयाचे आदेश धडकताच…
एप्रिल महिन्यात सर्वोच्च मागणीची नोंद
महावितरणकडून यंदाच्या उन्हाळ्यात १७ एप्रिल २०२४ रोजी सर्वाधिक २५ हजार ६८ मेगावाॅट विजेची मागणी नोंदवली गेली. तर २७ फेब्रुवारीला २५ हजार २३ मेगावाॅट, २७ मार्चला २५ हजार ३५ मेगावाॅट, १९ एप्रिलला २४ हजार ८०५ मेगावाॅट, २२ मे रोजी २४ हजार ६०४ मेगावाॅट, ३ जूनला २४ हजार ४४३ मेगावाॅट विजेची मागणी नोंदवली गेली. परंतु आता ही मागणी कमी झाली आहे. तर अधून- मधून एक- दोन दिवस पाऊस लांबल्यास पून्हा मागणीमध्ये वाढही नोंदवली जात असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
हेही वाचा : “आम्ही काय फक्त काँग्रेस – राष्ट्रवादीच्या उमेदवारांची भांडीच घासायची का?”, उद्धव सेना भडकली
वीजेची मागणी कमी होण्याची कारण?
राज्यातील बऱ्याच भागात पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे काही भागातील वातानुकूलित यंत्र, कुलर, कृषीपंपासह इतरही विद्युत उपकरणांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे वीजेच्या मागणीत घट झाली आहे.