नागपूर : मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे फेब्रुवारीच्या अहवालातून स्पष्ट झाले. मात्र, आता महाराष्ट्रात सर्वसाधारण बिबट्यांसोबतच काळ्या (मेलेनिस्टिक) बिबट्यांची संख्या देखील वाढत आहे. राज्यातील पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासह नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, रत्नागिरी आणि आता भंडारा वनविभागातही काळ्या बिबट्याचा वावर दिसून आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा जिल्ह्यातील लेंडेझरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी रुग्णवाहिकेतून प्रवास करत असताना लोहारा-लेंडेझरी रस्त्यालगतच्या जंगलात त्यांना काळा बिबट दिसला. त्यांनी छायाचित्रण केले. वन्यप्राण्यांच्या शरीरात ‘मेलेनिन’ या रंगद्रव्याचे प्रमाण वाढल्यास त्याच्या कातडीचा रंग अधिक गडद होतो. हा बिबट लेंडेझरीच्या जंगलात इतर पर्यटन क्षेत्रातून आला असण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो या परिसरात दिसून येत आहे. मात्र, त्याला पाहण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने भंडारा वनविभागाने त्याची प्रसिद्धी केली नाही. मात्र, तीन दिवसांपूर्वी लेंडेझरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या काळ्या बिबट्याची तयार केलेली चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याने या परिसरातील गस्त वाढवण्यात आली आहे. यापूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत २०२१ साली गणनेदरम्यान नवेगाव राष्ट्रीय उद्यानात काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. मात्र, २०२३ मध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात याच काळ्या बिबट्याची शिकार देखील उघडकीस आली.

हेही वाचा : मुनगंटीवार रावत यांच्या परस्परांना, विजयाच्या शुभेच्छा, जोरगेवार पडवेकर यांचा सोबत चहा

येथे आढळले काळे बिबट…

२०१८ साली ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात कोळसा पर्यटन प्रवेशद्वाराजवळ काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. २०२१ मध्येही तो पर्यटकांना दिसला. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये मदनापूर प्रवेशद्वाराजवळ बिबट्याचे दोन काळे बछडे दिसून आले. त्यातील एक अतिशय काळा तर दुसरा किंचित काळा होता. या व्याघ्रप्रकल्पात चार काळे बिबट आहेत. जून २०२४ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात काळ्या बिबट्याची नोंद झाली. पश्चिम घाटातील आंबोलीच्या जंगलात फेब्रुवारी २०२४ मध्ये काळा बिबट दिसला. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पात काही महिन्यांपूर्वी काळ्या बिबट्याची नोंद झाली.

हेही वाचा : डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.

वर्षभरापासून याठिकाणी वास्तव्य

कोणत्याही संघर्षाशिवाय हा काळा बिबट लेंडेझरी, नाकादोंद्री आणि जामकांद्री परिसरात वावरत आहे. याच परिसरात त्याने आतापर्यंत १०० चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापले असावे. यापूर्वी भंडारा वनविभागात काळा बिबट कधीच आढळला नाही. त्यामुळे तो खवासातून पेंच, नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या कॉरिडॉरमधून आला असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून तो याठिकाणी आहे. मात्र, आम्ही ही गोष्ट ठरवून सामाईक केली नाही, असे भंडारा जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक शाहीद खान म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra increase in number of melanistic black leopards rgc 76 css