वर्धा : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यातील विविध शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस व बीडीएस अश्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सूरू आहे. खासगी महाविद्यालयात सुमारे १५ टक्के जागा या संस्थागत कोट्यातून प्रवेशासाठी राखीव ठेवल्या जातात. हि प्रवेश प्रक्रिया सूरू होण्यापूर्वी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या शुल्क नियमन प्राधिकरणाकडून खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यासक्रमाचे शुल्क ठरविल्या जाते. त्यात शैक्षणिक शुल्क तसेच विकास शुल्क याचा समावेश असतो. संस्थागत कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी नियमित शुल्कच्या तीन पट शुल्क आकरण्याचा निर्णय झाला आहे. संबंधित महाविद्यालयानी तशी माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणे अपेक्षित आहे. मात्र दोन कॅप प्रवेश फेऱ्यांचे निरीक्षण केल्यावर संस्थागत कोट्याच्या जागा काही खासगी महाविद्यालयात जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.
या जागांवर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार अर्ज दाखल केले होते. त्यांच्या गुणवत्तेनुसार या विद्यार्थ्यांचे प्रवेश संस्थागत कोट्यात घोषित झाले. विद्यार्थी प्रवेशासाठी गेले. मात्र विविध कारणे देत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे या जागा पहिल्या व दुसऱ्या फेरीत रिक्त राहल्या. या सर्व प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला. हितसंबंध जोपसण्यासाठी ठराविकच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळेच नियमाप्रमाणे प्रवेश मिळालेल्या विदयार्थ्यांना टाळण्यात आले, असा आरोप करीत शिवसेनेचे कल्पेश यादव यांनी या प्रकाराची चौकशी करीत प्रवेश प्रक्रियेचा अहवाल घ्यावा, अशी मागणी केली होती. तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाय यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार घडामोड झाली आहे. संचालनालाय व आयुषच्या आयुक्त कार्यालयाने या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या अधिष्ठात्यांना दिले आहेत. तसेच पुढील आठ दिवसात याबाबतचा अहवाल संचालक कार्यालयास सादर करण्याची सूचना आहेत.
हेही वाचा : राजेंद्र शिगणे तुतारी फुंकणार, शरद पवार गटात परतीचा मुहूर्त ठरला!
काही वैद्यकीय खासगी महाविद्यालयाकडून विकास शुल्कच्या नावाखाली पालकांची लूट सूरू असल्याच्या तक्रारी आहेत. विकास शुल्क म्हणून एकूण शुल्कच्या दहा टक्के रक्कम रक्कम घेणे अपेक्षित असतांना ५० हजर ते २ लाखाच्या दरम्यान अतिरिक्त शुल्क वसुली होत असल्याचे म्हटल्या जाते.वैद्यकीय आयुक्त कार्यालयाने चौकशी आदेश देतांना महाविद्यालयांची नावे नमूद केली आहेत.
हेही वाचा : भावी मुख्यमंत्री कोण हे तर फडणवीसांनीच स्पष्ट केले; आ. गायकवाड म्हणतात,‘बहीण, सामान्यांच्या…’
श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पूणे, माईर्स मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे, अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर, एमआयएमएसआरएस मेडिकल कॉलेज लातूर, तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई, वेदांता मेडिकल कॉलेज पालघर, डॉ. एन.वाय. तासगावकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स कर्जत, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पूणे, प्रकाश इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च इस्लामपूर सांगली.