नागपूर : राज्यात बेकायदेशीर खाणकामाचा आलेख वाढत असून कारवाईही वाढत आहे. २०२० ते २०२४ या चार वर्षांत सर्वाधिक कारवाई करण्यात आली. २०२३-२४ या वर्षात तब्बल ३ हजार ५८० वाहने व यंत्र जप्त करण्यात आले. माहिती अधिकारातून हा तपशील समोर आला आहे. दरम्यान राज्यात कोण- कोणते खनिज आढळतात, याबाबतही आपण जाणून घेऊ या.
राज्यात बॉक्साईट, अगेट, चुनखडी, कोळसा, लोहखनिज, मँगनीज, चुनखडी, सिलिका वाळू, कायनाईट, सीलिमनाईट, क्रोमाईट, इलमेनाईट, डोलोमाईट, तांबे, टंगस्टन, जस्त, सोपस्टोन, क्वार्टझ, अगेट, क्ले, बेराईट, ग्रॅफाईट फ्लोराईट, वाळू इत्यादी खनिजे आढळतात. त्यापासून केंद्र व राज्य सरकारला मोठा महसूलही मिळतो. परंतु, बेकायदेशीर खाणकामामुळे या खनिजांची लूट होऊन सरकारचा महसूल बुडत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारातून बेकायदेशीर खाणकामावरील कारवाईची माहिती मागितली होती.
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय त्यांना दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २०२०-२१ मध्ये अवैध खाणकाम करणारी १ हजार १४९ वाहने व यंत्र जप्त करण्यात आले. २०२१-२२ दरम्यान २ हजार २३३ वाहने व यंत्र, २०२२-२३ दरम्यान १ हजार ६०० वाहने व यंत्रे तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात सर्वाधिक ३ हजार ५८० वाहने व यंत्रे जप्त करण्यात आली. २०२२-२३ मध्ये राज्यातील ३५ जिल्हे, शहरात तब्बल ५,९४६ बेकायदेशीर खाणकामाच्या प्रकरणात ८३ कोटी २९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २०२३-२४ या वर्षात ८,८२५ बेकायदेशीर खाणकामाच्या प्रकरणातून ११६ कोटी ४३ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, नागपूर येथील उपसंचालक व जन माहिती अधिकारी रो. रा. मेश्राम यांनी ही माहिती दिली. या माहिती मुळे राज्यात खनिजांची लूट थांबणार कशी? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
जप्त वाहने व यंत्रांची आकडेवारी (वर्ष २०२३-२४)
जिल्हे – प्रकरणे – जप्त यंत्र व वाहने
जळगाव – ७०८ – ३२०
पुणे – १९१ – ०८९
जालना – २०९ – २३९
परभणी – २१० – २६५
बीड – १५२ – १९४
अमरावती – २४३ – १४३
यवतमाळ – ५१३ – २७३
नागपूर – ३९६ – ०२९
भंडारा – ३३९ – ४०६
चंद्रपूर – ३८२ – १२७
गडचिरोली – २६५ – १८५