नागपूर : राज्यात पोलीस उपनिरीक्षकांची अडीच हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. तरीही गेल्या आठ महिन्यांपासून पदोन्नतीस पात्र पोलीस हवालदारांना अद्याप पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली नाही. पदे रिक्त असल्यामुळे गुन्हे निर्गती, गुन्ह्यांचा तपास आणि बंदोबस्ताचा ताण वाढला आहे. राज्यात पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची २५०० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. पोलीस महासंचालकांनी २०१३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पात्रता मिळवलेल्या ६६० पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला होता. २६ डिसेंबर २०२३ ला संवर्गही मागविण्यात आले होते. मात्र, या आदेशाला आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप पदोन्नतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
हेही वाचा : “हरलो तरी बेहत्तर, पण महायुतीला ताकद दाखवूनच देणार”, मित्रपक्षाच्याच नेत्याने ठोकला शड्डू
२ हजार ५८६ पदे रिक्त
राज्य पोलीस दलात २ हजार ५८६ पोलीस उपनिरीक्षकांची पदे रिक्त आहेत. सर्वाधिक रिक्त पदे मुंबई विभागात असून नागपूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई विभागात १७४५, नागपुरात २०७, पुणे विभागात १९९, अमरावती १५० , छत्रपती संभाजीनगर ११६ आणि नाशिकमध्ये ९८ पदे रिक्त आहेत.
हेही वाचा : नागपुरातील शाळांसमोर जीवघेणी वाहतूक…ना व्यवस्थापनाला चिंता, ना पोलिसांना काळजी…
पोलीस हवालदारांचे डिसेंबरमध्ये संवर्ग मागण्यात आले होते. आचारसंहिता आणि अन्य शासकीय नियोजनामुळे पदोन्नती लांबली. पदोन्नतीसंदर्भात प्रक्रिया असून येत्या काही दिवसातच ती पूर्ण होईल.
संजीव सिंगल, अतिरिक्त पोलीस महासंचालक, आस्थापना विभाग, मुंबई