नागपूर : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका नागरिकांना सहन करावा लागत असतानाच आता हवामान खात्याकडून एक नवीन अंदाज जाहीर करण्यात आला आहे. हा अंदाज प्रत्यक्षात उतरल्यास ‘ऑक्टोबर हीट’पासून नागरिकांची सुटका होईल की हे चटके आणखी सहन करावे लागतील हे कळणार आहे.

हवामान खाते काय म्हणजे ?

उन्हाळ्यात राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाच्या पाऱ्याने ४५ अंश सेल्सिअस पार केले होते. तर आता ‘ऑक्टोबर हीट’ उन्हाळ्यातील त्या चटक्यांपेक्षाही घाम काढणारा ठरतो की काय, अशी स्थिती आहे. दरम्यान, पाऊस मात्र अधूनमधून डोकावतच आहे. येत्या सहा ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. अशातच आता हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्यामुळे या ‘ऑक्टोबर हीट’पासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने आजदेखील राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा : नागपूर: अपघात विम्याचे पैसे उकळण्यासाठी रचला कट, पण पोलिसच अडकले

पावसाची शक्यता कुठे ?

धुळे, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवार आणि रविवार विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी परतीचा पाऊस सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या उपराजधानीसह म्हणजे नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुढील तीन दिवस पाऊस राहू शकतो. त्यामुळे नवरात्रीच्या आनंदावर पावसाचे विरजण पडू शकते.

‘ला निना’ कसा परिणाम करेल ?

‘ला निना’ वादळाचा प्रभाव ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यातच ‘ला निना’चा प्रभाव जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास म्हणजेच ‘ला निना’चा प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाल्यासर डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात तापमानात मोठी घट होऊ शकते. त्यामुळे या कालावधीत कडाक्याची थंडी पडून हिवाळा चांगलाच हुडहुडी भरवणारा ठरू शकतो.

हेही वाचा : वर्धा: हिट अँड रन प्रकरणात एकास अटक, एक अल्पवयीन फरार

देशाच्या इतर भागातील स्थिती काय ‌‌?

पुर्वेकडील राज्ये तसेच दक्षिण भारतातील काही भागांमध्ये कडाक्याच्या थंडीचा अंदाज आहे. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये थंडी जास्त जाणवेल असा अंदाज आहे. दरम्यान, १५ ऑक्टोबरपासून थंडी पडण्यास सुरवात होईल, असा अंदाज आहे.