नागपूर : एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट आणि अग्रिम रक्कमही मिळाली नाही. त्यामुळे कर्मचारी संतापले असून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते व महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांचा निषेध करण्यात आला.
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट द्यावी, अग्रिम रक्कम द्यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीमध्ये सहभागी विविध कामगार संघटना आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघ, महाराष्ट्र यांनी केली. महामंडळानेही दिवाळी भेट आणि अग्रिम देण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. परंतु, प्रत्यक्ष दिवाळी आली तरी भेट वा अग्रिम रक्कमही मिळाली नाही. यावर प्रतिक्रिया मिळवण्यासाठी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांनी मात्र शासनाकडून अद्याप निर्णयाबाबत काहीच कळवण्यात आले नसल्याचे मान्य केले.
शासन व महामंडळ कर्मचाऱ्यांची गळचेपी करत आहे. शासनाला भविष्यात याची किंमत मोजावी लागेल.– संदीप शिंदे, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना.
घरावर काळे झेंडे
गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या सेवा शक्ती संघटनेच्या वतीने संघटनेचे कार्याध्यक्ष सतीश मेटकरी यांनी एसटी कामगारांना घरासमोर काळी रांगोळी काढण्याचे व काळे आकाश कंदी, काळे ध्वज लावून काळी दिवाळी सादर करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा : विमानात बॉम्ब स्फोट करण्याची धमकी, देणारा जगदीश उईके पोलिसांच्या ताब्यात
एसटी कर्मचाऱ्यांना मागच्या वर्षी महामंडळाकडून पाच हजार रुपये दिवाळी भेट दिली होती. यंदाही सहा हजार रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर झाला. परंतु पुढे काहीच झाले नाही. – श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस.