नागपूर: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट आणि अग्रिम रक्कम मिळणार नसल्याचे लोकसत्ताने पुढे आणले होते. त्यावर एसटीचे वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची गुरूवारी (७ नोव्हेंबर) बैठक झाली. त्यात महामंडळाने निवडणूक आयोगाने मंजूरी दिल्यास दिवाळी भेट देण्याचे मान्य केले. त्यामुळे पून्हा कर्मचाऱ्यांमध्ये दिवाळी भेटची आशा पल्लवीत झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत झालेल्या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख आणि इतरही काही अधिकारी उपस्थित होते. तर मान्यताप्राप्त संघटनेकडून राज्य अध्यक्ष संदीप शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : अकोला : प्रचारासाठी ‘योगी आदित्यनाथां’ची चक्क जेसीबीतून मिरवणूक? भाजप उमेदवाराच्या ‘आयडिया’ची चर्चा

संघटनेकडून बैठकीत दिवाळी भेट व उचलबाबत आक्रमक भुमिका घेतली गेली. संघटना म्हणाली, दिवाळी भेटीची मागणी आचारसंहीतेपुर्वीची असून त्याला बोर्डाच्या बैठकीतही आधीच मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे या दिवाळी भेट आणि उचलचा आचारसंहितेशी जोडणे चुकीचे आहे.

दरम्यान महामंडळाकडून संघटनेला तांत्रिक अडचणी समजावून सांगण्यात आले. त्यानंतर संघटनेच्या मागणीवरून एसटी महामंडळाने निवडणूक आयोगाला साकडे घालत त्यांनी दिवाळी भेट देण्याला मंजूरी दिल्यास या निधीचे वाटप करण्याचे मान्य केले. त्यापूर्वी संघटनेकडून यंदाच्या दिवाळीत कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने अनेकांना कर्ज काढावे लागल्याचे सांगितले.

हेही वाचा : माजी मुख्‍यमंत्र्यांचे चिरंजीव चक्क सामान्‍यांच्‍या खुर्चीत! वलगावातील सभेत…

किमान आताही ही आर्थिक मदत मिळाल्यास कर्मचारी कर्जमुक्त होणे शक्य असल्याचेही संघटनेने सांगितले. त्यामुळे महामंडळाकडून लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटीबाबतचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्याला आयोगाची मंजूरी मिळाल्यास हा निधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वळता केला जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या विषयावर महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळायलाच हवी. हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. या विषयावर महामंडळ प्रशासासोबत गुरूवारी बैठक झाली. त्यात अधिकाऱ्यांनी भेट देण्याचे मान्य करत त्यासाठी निवडणूक आयोगाला परवानगी मागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आयोगाची परवानगी मिळाल्यावर ही भेट मिळणार आहे.

.

संदीप शिंदे, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

प्रक्रिया सुरु केली परंतु मिळालीच नाही

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट व अग्रिम रक्कम द्यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीमध्ये सहभागी विविध कामगार संघटना आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघ, महाराष्ट्र यांनी केली होती. त्यावर महामंडळानेही दिवाळी भेट व अग्रिम देण्याबाबतची प्रक्रिया दिवाळीच्या एक दिवसापूर्वी सुरू असल्याचे सांगितले. परंतु, प्रत्यक्षात भेट मिळाली नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra st mahamandal employees again hope for diwali bonus mnb 82 css