नागपूर : पवित्र पोर्टलद्वारे नविन भरती प्रक्रिया राबविण्यापूर्वी सध्या कार्यरत शिक्षकांना बदलीची संधी मिळावी अशी राज्यातील शिक्षकांची मागणी होती. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून यासंबंधी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने स्वतंत्र आदेश निर्गत केल्याने राज्यातील शिक्षकांच्या जिव्हाळ्याची मागणी पुर्णत्वास गेली असून नजिकच्या काळात बदल्यांचा मार्ग सुकर झाल्याची माहिती शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दीप्रमुख राजेश सावरकर यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरली जावीत यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दीर्घकाळ पाठपुरावा करीत शिक्षक भरती प्रक्रीयेला चालना दिली होती. मात्र सदरच्या प्रक्रीये दरम्यान शिक्षक बदल्यांचे धोरणाचा शासन स्तरावर फेरविचार सुरु झाल्याने शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे सरचिटणीस राजन कोरगांवकर, कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील यांनी नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांना बदलीची संधी मिळावी यासाठी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केल्याने २१/६/२०२३ रोजी शालेय शिक्षण विभागाने बदल्यांसाठी आदेश पारीत केला होता.

हेही वाचा : पदव्युत्तर भत्त्याच्या निकषांवर वैद्यकीय शिक्षकांचा आक्षेप; नवीन वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षक मिळणार कसे?

मात्र जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांचे अधिकार ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात. त्यामुळे गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी याबाबतीत मंत्रालय स्तरावर ग्रामविकास विभागाकडून स्वतंत्र आदेश निघावा यासाठी पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना आणि बदली इच्छुक शिक्षकांच्या अपेक्षांना यश आले असून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या कडील मंजूर टिपणीनुसार या विभागाचे उपसचिव पी.डी.देशमुख यांनी ११ मार्च याबाबतीत स्वतंत्र पत्र काढून नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी २१ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार बदल्या कराव्यात असा स्वतंत्र आदेश निर्गत केला. त्यामुळे नजिकच्या काळात बदल्याचा मार्ग सुकर झाल्याने राज्यातील शिक्षकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : आमिर खान वर्धा दौऱ्यावर येणार, खास शेती पाहण्यास खेड्यात जाणार …

शिक्षक समितीचे अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकीशोर पाटिल, कोषाध्यक्ष प्रशांत निमकर,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शैलेन्द्र दहातोंडे,महीला आघाडी प्रमुख सरीता काठोळे,कार्याध्यक्ष सुषमा वानखडे,कोषाध्यक्ष भावणा ठाकरे,अजय पवार,तुळशिदास धांडे,प्रफुल्ल शेंडे,उमेश चुनकीकर,संगिता तडस,अल्हाद तराळ,प्रेमसुख ठोंबरे
यांनी या शासन निर्णयाचे स्वागत केले आहे .

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra transfer of teachers posting will starts soon dag 87 css