नागपूर: पूर्व विदर्भातील बऱ्याच भागात डेंग्यूने डोके वर काढले असून येथील रुग्णसंख्या अडीचशेहून पुढे गेली आहे. विशेष म्हणजे, निम्म्याहून अधिक रुग्ण हे केवळ नागपूर जिल्ह्यात आढळले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या नोंदीनुसार १ जानेवारी २०२३ ते २ ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्व विदर्भात डेंग्यूचे २५७ रुग्ण आढळले. तर नागपूर जिल्ह्यात या आजाराचा एक मृत्यूही नोंदवला गेला. एकूण रुग्णांमध्ये निम्मे रुग्ण हे गेल्या दोन महिन्यात आढळले आहे. सर्वाधिक १११ रुग्ण हे नागपूरच्या शहरी भागातील आहे. तर नागपूर ग्रामीणला ३५ रुग्णांची नोंद झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही ५१ रुग्ण, चंद्रपूर शहरात ३, चंद्रपूर ग्रामीणला १४, गोंदियाला २६, भंडाराला ३, वर्धेला १४ रुग्ण नोंदवले गेले.
हेही वाचा… नागपूर: ब्रिटिशकालीन “महाराजबाग प्राणिसंग्रहालय”चे एका तपानंतर विकासाचे स्वप्न पूर्ण
दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागासह नागपूर महापालिकेकडून डेंग्यू नियंत्रणासाठी सर्वत्र फवारणी सुरू केली असून सर्व शासकीय व महापालिकेच्या रुग्णालयांत आवश्यक औषध उपलब्ध केल्याचा दावा होत आहे. तर शहर व गावात जनजागृतीही केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या डेंग्यूच्या आकडेवारीला नागपूरच्या आरोग्य उपसंचालक आणि नागपूर महापालिका कार्यालयानेही दुजोरा दिला आहे.
डेंग्यूची स्थिती
(१ जानेवारी ते २ ऑगस्ट २०२३)
जिल्हा रुग्ण
नागपूर (ग्रा.) ३५
नागपूर (श.) १११
वर्धा १४
भंडारा ०३
गोंदिया २६
चंद्रपूर (ग्रा.) १४
चंद्रपूर (श.) ०३
गडचिरोली ५१
एकूण २५७