बुलढाणा: राज्यकर्ते व सरकारने शेतकऱ्यांना शब्द द्यायचा असेल तर शंभर वेळा विचार करणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. सत्तेत आल्यावरही याचा पुनरुच्चार केला. मात्र आता राज्य सरकार शब्द बदलत आहे. आता शेतकऱ्यांचा आसूड हातात घेण्याची खरी वेळ आली आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले.
मेहकर येथील ज्योती सावित्री सेवा संघाच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हे मेहकर येथे आले होते. यनिमित्त मेहकर येथील सुप्रसिद्ध स्वातंत्र्य मैदान येथे काल शुक्रवारी कार्यक्रम पार पडला.
रात्री उशिरा कार्यक्रम पार पडूनही अमोल कोल्हे यांचे भाषण ऐकण्यासाठी मेहकर परिसरातील नागरिकांची चांगलीच गर्दी उसळली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, ज्यावेळी विचार मांडायचे असतात तेव्हा गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाचे असतात. या मातीने महाराष्ट्राला, बुलढाणा जिल्ह्याला नैतिक अधिष्ठान दिले आहे. तब्बल साडेतीनशे वर्षानंतर ज्यांचे नाव आजही सर्वत्र मोठ्या अभिमानाने घेतले जाते ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई राष्ट्रमाता जिजाऊंचा हा जिल्हा आहे. आजचा कार्यक्रम महिलांनी आयोजित केला याचा आनंद वाटला.
मी यासाठी आलो की आपल्या माता भगिनींना जिजामातेचे मातृत्व, सावित्रीबाईचे कर्तुत्व व अहिल्याबाई होळकरांचे नेतृत्व असा वारसा लाभलेला आहे. कर्जमाफीवर सरकार बदलले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा आसूड हातात घेण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना शब्द द्यायचा असेल तर १०० वेळा विचार करा, असा परखड सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला. आपल्याला महापुरुषांच्या जयंत्या डी.जे.वर नाही तर वैचारिक विचारांवर साजऱ्या करायच्या आहेत . विकासाच्या मागे लपले की पापे धुऊन जातात. एकेकाळी छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हणायचे की घरे मोडून विकास होत नाही ते विचार आज कुठे गेले, असा सवाल त्यांनी केला.