यवतमाळ : महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण (ता. महागाव) येथील शेतकरी साहेबराव करपे आणि कुटुंबाच्या आत्महत्येचे स्मरण आणि शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध म्हणून बुधवारी महागाव तालुक्यातील चिलगव्हाणसह गुंज, पुसद, यवतमाळ आदी ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. याद्वारे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहवेदना प्रकट करण्यात आल्या. आंदोलनात शेतकऱ्यांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते.
यवतमाळ येथे विविध सामाजिक संघटना आणि सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्यावतीने शेतकरी सहवेदना दिनानिमित्त चर्चासत्र आयोजित करण्यात आले. विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या चर्चासत्रात सहभागी होत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांवर विचारमंथन केले. यावेळी युवकांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेतली. या चर्चासत्रात नंदकुमार बुटे, प्रा. घनश्याम दरणे, पत्रकार नितीन पखाले, राजकुमार भीतकर, मृणालिनी दहीकर, सीमा तेलंग, प्रा. प्रिया वाकडे, प्रवीण देशमुख, आशीष महल्ले, प्रा. पंढरी पाठे, अशोक भुतडा, विजय निवल, प्रा. सुवर्णा ठाकरे आदी सहभागी झाले होते.
अन्नत्याग आंदोलनस्थळी दिवसभरात अनेक नागरिकांनी भेट देऊन आपली सहवेदना व्यक्त केली. चिलगव्हाण येथे ग्रामपंचायत कार्यालयात साहेबराव पाटील करपे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. दिवसभर उपवास करून करपे व कुटुंबीयांप्रती शोक संवेदना व्यक्त करण्यात आल्या. चिलगव्हाण येथील सरपंच प्रभावती काळे, उपसरपंच अर्चना सूर्यवंशी, पोलीस पाटील डॉ. लक्ष्मण बोरकुट, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष रामेश्वर करपे, प्रमोद काळे, मारोतराव करपे, अशोक करपे, डॉ. संदिप शिंदे, एस.टी.भगत, ज्ञानेश्वर ठाकरे, ग्रामसेवक सुलोचना कुरवाडे, सुधाकर काळे आदी अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले होते.
गुंज येथे ग्रामपंचायत सभागृहामध्ये अन्नत्याग आंदोलन करून साहेबराव करपे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शेतकरी नेते नागोराव पाटील कदम, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव, ओमप्रकाश देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती गजानन कांबळे, ग्रा.पं.सदस्य दत्तराव काळे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
पुसद येथे तहसील कार्यालय परिसरात आयोजित अन्नत्याग आंदोलनात पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी, प्रत्येक शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. शेतातील उत्पादनाला दर हमी मिळत नाही, आणि शेतकऱ्यांच्या श्रमाची किंमत सरकारला नाही. सरकार शेतकरी धोरणावर काम करणार असेल तरच महाराष्ट्रात पोशिंद्याचे जगणे सुकर होईल, असे प्रतिपादन केले. यावेळी शेतकरी नेते मनीष जाधव, दीपक आनंदवार, देवेंद्र राऊत, विश्वास भवरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या
चिलगव्हाण (ता.महागाव) येथील साहेबराव पाटील करपे या वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने १९ मार्च १९८६ रोजी पत्नी आणि मुलाबाळांसह विषाचा घोट घेत मरणाला कवटाळले. एकाच दिवशी चिलगव्हाणमध्ये सहा चिता पेटल्या. गावकऱ्यांचा आक्रोश दगडाला पाझर फोडणारा होता, परंतु काळजाचा ठोका जिवंत नसलेल्या शासनाची संवेदना जागली नाही. मागील ३९ वर्षात महाराष्ट्रात हजारो शेतकर्यांना आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेण्यास व्यवस्थेने भाग पाडले.
देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याने नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःसह कुटुंबाची आहुती दिली. या आत्मघातात जीवनयात्रा संपविणाऱ्या शेतकरी कुटुंबाप्रती सहवेदना आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी व शेतकरी पुत्रांनी दरवर्षी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलनासह शेतकरी सहवेदना दिवसाचे आयोजन सुरू केले.