बुलढाणा : मध्यरात्री बसस्थानक वर एकटीच असलेल्या महिलेची रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी चौकशी केली.मात्र भाषेची अडचण आल्याने तिची माहिती काढणे तर दूरच संभाषण करणेही अशक्य ठरले. सुदैवाने ‘त्या’ महिले जवळ असलेल्या आधार कार्ड वरून पोलिसांनी शोध घेत तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले.मेहकर शहर परिसरात काल १२ डिसेंबर रोजी हा घटनाक्रम घडला. मेहकर पोलिसांनी मानवीय भूमिकेतून सतत प्रयत्न करीत ‘त्या’ महिलेला तेलंगणा राज्यातील नातेवाईकांच्या स्वाधीन केले. यानंतरच पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. या घटनाक्रमाची पार्श्वभूमी देखील तेवढीच रंजक आहे.
असा आहे घटनाक्रम
मेहकर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुखदेव ठाकरे आणि जमादार शिवानंद तांबेकर हे १२ डिसेंबर रोजी रात्रीची गस्त घालत होते.मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ते मेहकर बस स्थानक येथे पाहणी करीत असताना त्यांना एक महिला थंडीत काकडत एकटीच बसल्याचे दिसून आले.त्यांनी तिची चौकशी केल्यावर ती तेलगू भाषेत उत्तर देत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी समजत नसल्याने व पोलिसांना तिची भाषा समजत नसल्याने मोठी अडचण झाली. या दोघा कर्मचाऱ्यांनी याची माहिती ठाणेदार भाऊराव घुगे यांना दिली. तसेच रात्रपाळी वर असलेल्या महिला पोलीस सोफिया पठाण यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.मात्र त्यांनाही संभाषण करता आले नाही.
हेही वाचा…गोंदिया : आसाम वरून मुंबईला जाणारे सुपारीचे ट्रक बेपत्ता
ॉ
‘आधार’चा आधार!
दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या महिलेला मेहकर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथील महिला कक्षात पोलीस सोफिया पठाण, राणी जमादार, करीम शाह यांनी पुन्हा तिची चौकशी करण्याचा असफल प्रयत्न केला. मात्र याने हार ना मानता पोलिसांनी तिच्या जवळील थैलीची तपासणी केली असता त्यात त्या महिलेचे आधार कार्ड सापडले. त्यावर त्या महिलेचे नाव शोभा यल्लमा महिलाआरम (३३, करमपेल्ली , निजामाबाद) आणि ती तेलंगणा राज्याची रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. आधार कार्ड वर मोबाईल क्रमांक देखील होता. त्या मोबाईल वरून महिलेच्या नातेवाईकांशी हवालदार राजेश जाधव, शिवानंद केदार यांनी संपर्क साधत महिला सुखरूप असल्याचे सांगितले. दरम्यान १२ तारखेला रात्री उशिरा महिलेचे नातेवाईक खाजगी वाहनाने मेहकर येथे आल्यावर खात्री पटल्यावर शोभा यल्लमा हिला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी त्या सर्वांनी मेहकर पोलिसांचे आभार मानत निरोप घेतला तेंव्हा सर्वांचे डोळे आनंदाश्रूने ओले झाले होते…