नागपूर : गेल्या तीन वर्षात राज्यात एक लाखांपेक्षा जास्त अपघात झाले असून या अपघातांमध्ये ४५ हजार ८९५ जणांचा मृत्यू झाला. रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक १६ ते ४० या वयोगटातील युवा वर्गाचा समावेश आहे. अपघातातील मृत्यूंमध्ये युवा वर्गाचे प्रमाण ६६ टक्के आहे, माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त झाली.
नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणामुळे वाहनांच्या बनावटीत बराच बदल झाला असून नवनिर्मित वाहने वाऱ्यांशी स्पर्धा करणाऱ्या वेगाने पळतात. तसेच वाहतूक नियमांबाबत जनजागृती होत नसल्याने देशात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात गेल्या वर्षी सरासरी १.७५ लाख जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. दररोज सरासरी चारशेवर मृत्यू रस्ते अपघातातून होत आहेत. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि तेलंगणा या राज्यात सर्वाधिक रस्ते अपघात होत आहेत.
रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्रात प्रथम पाच राज्यांमध्ये आहे. महाराष्ट्रातील अपघाती मृत्यूचे प्रमाण संपूर्ण देशाच्या तुलनेत जवळपास ९ टक्के आहे. राज्यात गेल्या तीन वर्षांत १ लाख ४ हजार ७१० अपघात झाले असून त्यामध्ये ४५ हजार ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये युवा वर्गांचा टक्का सर्वाधिक आहे. १६ ते ४० या वयोगटातील ६६ टक्के युवक रस्ते अपघातात मृत्यू पावल्याची नोंद पोलिसांकडे आहे. रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये वृद्ध, महिला यांचा टक्का कमी आहे. तांत्रिक चुकीतून होणाऱ्या अपघाताच्या तुलनेत मानवी चुकांमुळे झालेल्या अपघातांची संख्या ७८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
राज्यात सर्वाधिक मृत्यू पुण्यात
२०२४ मध्ये राज्यात सर्वाधिक रस्ते अपघात पुण्यात घडले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये ३ हजार ४४५ रस्ते अपघातात सर्वाधिक १२९९ जणांचा बळी गेला आहे. दुसऱ्या स्थानावर नाशिकचा क्रमांक असून ९४१ जण रस्ते अपघातात ठार झाले आहेत. अहिल्यानगरात ८७३ जण ठार झाले असून नागपूर शहर आणि जिल्ह्यात ७६१ जण ठार झाले आहेत. पाचव्या स्थानावर सोलापूर असून ७२४ जणांचा रस्त अपघातात बळी गेला आहे.
वर्ष | अपघात | मृत्यू |
२०२२ | ३३३८३ | १५२२४ |
२०२३ | ३५२४३ | १५३६६ |
२०२४ | ३६०८४ | १५३३५ |