नागपूर : एसटीचे कर्मचारी हे ब्रँड ॲम्बेसेडर व सुंदरी पेक्षा चांगली सेवा प्रवाशांना देत असून शिवनेरी सुंदरीचा मोह सोडून नवीन अध्यक्षांनी एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या समंस्स्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. मुंबईत १ ऑक्टोंबरला (मंगळवारी) काल महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ३०४ व्या सभेत महामंडळाचे नवीन अध्यक्ष भरत गोगावले यांनी शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात शिवनेरी सुंदरीची घोषणा ही परिस्थितीला अनुसरून नाही. आजही कर्मचारी व प्रवाशांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कर्मचारी- प्रवाश्यांच्या समस्या सोडवल्यास एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढ होऊन प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा देता येतील.

शिवनेरी बाबतीत बोलायचे झाल्यास ही सेवा महामंडळातील अत्यंत चांगली व फायदेशीर सेवा असून साधारण १२० इलेक्ट्रिक व डिझेल वरील बस या सेवेत आहेत. एसटीच्या वेगवेगळ्या सेवांच्या तुलनेत या सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आहे. एसटी महामंडळात या सेवेचे सरासरी भारमान हे ८० टक्के इतके आहे. या सेवेत अजून गाड्या वाढविण्याची गरज असून त्याची व्याप्ती निव्वळ पुणे, मुंबई, ठाणे या शहरांपुरती मर्यादित न ठेवता राज्यभर वाढवली पाहिजे. एसटीमध्ये आजही मागणीच्या तुलनेत सर्वच सेवेतील गाड्या कमी पडत असून त्यात प्रवाशांना अजून सेवा सुविधा दिल्या पाहिजेत. एसटी कर्मचारी व अधिकारी अत्यंत चांगले काम करीत असून जुन्या झालेल्या गाड्या घेऊन त्यांनी महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचविले आहे. त्यामुळे महामंडळाने ब्रँड ॲम्बेसेडर व शिवनेरी सुंदरीवर खर्च करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा फरक, महागाई भत्त्याची थकबाकी व वार्षिक वेतनवाढ प्रलंबित थकबाकी द्यावी. त्या मुळे कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य वाढून उत्पन्न वाढेल व ते ब्रँड ॲम्बेसेडर व शिवनेरी सुंदरी पेक्षा प्रवाशांना चांगल्या प्रकारे सेवा देतील, असेही बरगे यांनी सांगितले.

हेही वाचा : नागपूर : वंदे भारत एक्सप्रेस रद्द! रेल्वेचा निर्णय काय जाणून घ्या…

विमान सेवेत थांबे नाही, एसटीमध्ये मात्र…

विमान सेवा ही सलग सेवा असून तिला शक्यतो थांबे नसतात. त्यामुळे त्यांना खान पान देण्यासाठी हवाई सुंदरीची गरज असते. एसटीची कुठलीही सेवा ही थांब्याशिवाय नसून शिवनेरीच्या पुणे, मुंबई या सेवेत सुद्धा गाड्या चहा पाण्यासाठी थांबत असतात. त्या मुळे या गैरलागू योजनेचा फेरविचार करावा अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.