नागपूर : वाघाने गावातील महिलेवर हल्ला केला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाच घेराव घातला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे या हल्ल्यात काही वनकर्मचारी गंभीर जखमी झाले, तर काही किरकोळ जखमी झाले. पेंच व्याघ्रप्रकल्पातील या घटनेमुळे वनकर्मचारी देखील दहशतीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. येथेही गावकरी संतप्त होत वनविभागाच्या विरोधात रोष व्यक्त करतात. मात्र, वनकर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची घटना आजवर घडली नाही. तुलनेने पेंच व्याघ्रप्रकल्पात या घटना अगदीच मोजक्या आहेत. मात्र, एखादीही घटना घडली तरी गावकऱ्यांचे नियंत्रण सुटते. काही दिवसांपूर्वी देवलापार परिसरात देखील याच प्रकारची घटना घडली असती, पण प्रकरण थोडक्यात निभावले. मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याची ही नांदी आहे.

हे ही वाचा…अकोला : मनसैनिक जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; नेमकं घडलं काय?

पेंच व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत झिंझिरया गावातील रहिवासी नीता कुंभरे यांचा वाघाच्या हल्ल्यात सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला.

गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात पेंच व्याघ्रप्रकल्पाचे काही वनरक्षक गंभीर जखमी तर काही किरकोळ जखमी झाले. जमावाला शांत करण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. स्थानिक लोकांचा आक्रोश लक्षात घेता पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण), उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, उपविभागीय अधिकारी रामटेक व उपविभागीय पोलिस अधिकारी पारशिवनी/रामटेक यांनी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चाा केली. गावकऱ्यांच्या मागण्या जाणून घेऊन त्यांची नोंद घेतली. वनविभागातर्फे मृतकाच्या कुटूंबाला तात्काळ पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली असून उर्वरित मदतीची रक्कम तात्काळ देण्याची प्रक्रिया सूरु करन्यात आली.

हे ही वाचा…गडचिरोली : रुग्णवाहिकेतून डॉक्टर करायचा दारूची तस्करी, पोलिसांनी रंगेहाथ पकडले

या परिसरात वनविभागाचे कर्मचारी, प्राथमिक प्रतिसाद दल (पीआरटी) यांच्यामार्फत दिवस रात्र गस्त करण्यात येत आहे. अशा दुर्दैवी घटनांची पुनरावत्ती होऊ नये म्हणून वनविभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या वाघाला जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार समिती गठीत करण्यात आली. तसेच या भागामध्ये ट्रॅप कैमरा लावण्यात आले असून जागोजागी मचाण बांधण्यात आल्या आहेत व सर्व गावकऱ्यांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यवाहीमध्ये वनविभागास महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagapur village woman killed in tiger attack angry villagers attacked on forest department employees rgc 76 sud 02