नागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोंटू ऊर्फ अनंत जैन याने बनावट कंपनीच्या नावाने ट्रेडिंग अकाउंट तयार केले. त्या माध्यमातून सोंटूच्या खात्यातून जवळपास १०० कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. सोंटूच्या संपत्तीचा ताळमेळ बसविण्यासाठी आता विशेष सनदी लेखापालाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच सोंटूच्या कोट्यवधीच्या कमाईचा भंडाफोड होणार आहे.
सोंटू जैनने डायमंड एक्सचेंज नावाने ऑनलाईन गेमींग अॅप तयार केला. हा अॅप राकेश राजकोट याने बनवून दिला आहे. राकेश राजकोट याच्याकडे सोंटू जैनसारखे जवळपास दोनेशेवर बुकी काम करतात. कोट्यवधींमध्ये कमाई करणारा राकेश राजकोट ऊर्फ राजदेव याने तीन वर्षांपूर्वीच पत्नी व मुलांसह भारत देश सोडला आहे. त्याने संयुक्त अरब अमिरात या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. सोंटू जैन आणि राकेश राजकोट यांची भेट गुजरातमध्ये झाली होती.
राकेश हा गुजरातमधून ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजी करीत होता. राकेशवर १४०० कोटी रुपयांचा अहमदाबादमध्ये सट्टेबाजीचा गुन्हा दाखल आहे. राकेशवर मुंबई, दिल्ली, हैदराबादसह अन्य राज्यातही क्रिकेट सट्टेबाजीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.