नागपूर : दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे जखमी होऊन ११ रुग्ण नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी पोहचले. त्यात ११ वर्षांखालील चार रुग्णांचा समावेश आहे. नागपुरात दिवाळी सण उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीनिमित्त शहरातील सगळ्याच भागात घरोघरी रोषणाई करण्यासह फटाक्यांची आतषबाजीही केली जाते. लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने रविवारीही शहरात सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी केली गेली.
हेही वाचा : गोंदियात दिवाळीच्या रात्री दुचाकीला धडक दिल्याने तरुणाला तिघांनी चाकूने भोसकले, तरुणाचा मृत्यू
त्यात फटाक्यांमुळे डोळे वा शरीरातील इतर भाग वा कानाला फटाक्यांच्या आवाजामुळे त्रास होऊन मेडिकल रुग्णालयात ११ रुग्ण पोहोचले. त्यात ८ ते ११ वयोगटातील ४ मुलांचाही समावेश होता. तर काहींना फटाक्यांमुळे भाजून किरकोळ इजाही झाली होती. सगळ्यांवर उपचार करून त्यापैकी बहुतांश रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेल्याची माहिती मेडिकल प्रशासनाकडून दिली गेली. तर बऱ्याच खासगी रुग्णालयातही हे रुग्ण नोंदवले गेले.