नागपूर : शहर आणि ग्रामीण भागात जुगार अड्डे चालवण्यासाठी चर्चित घुईच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा घातला. पोलिसांनी १२ जुगाऱ्यांना अटक करून २१.४३ लाखांचा माल जप्त केला. मात्र, घुई पोलिसांच्या हाती लागला नाही. घुईचे साथीदार तुर्केल, मार्टीन आणि सोन्या यांचाही जुगार अड्डा मरीयमनगरातील एका शासकीय कार्यालयाच्या बाजूला सुरू आहे. मात्र, या जुगार अड्ड्यावर पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
सुनील रम्मू पटेल, रा. गोरेवाडा, किशोर मेंघरे रा. सोमलवाडा, रंजित राऊत रा. पंचशीलनगर, मयूर ठवरे रा. हिवरीनगर, संजय मोहर्ले, रा. रामबाग, हरीश खिलवानी रा. एमआयजी कॉलनी, धरमपाल धमके, रा. सोमलवाडा, घनश्याम साधवानी, रा. जरीपटका, सौरभ बावणे, रा. मस्कासाथ, नवीन सुरेश गौर, रा. हंसापुरी, हितेश करवाडे, रा. कुंभारटोली आणि सुधीर धुमाळे रा. गोरेवाडा, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांची अटक अटळ, अटकपूर्व जामीन नामंजूर
गणेश ऊर्फ घुई आनंद चाचेरकर (३५) रा. गोरेवाडा हा पिटेसूर वस्तीमागील मोकळ्या मैदानात मांडव टाकून जुगार भरवत असून शहरभरातील जुगारी तेथे खेळण्यासाठी येतात. रात्रभर तेथे जुगार चालतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मध्यरात्री घुईच्या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी घुई तेथे नव्हता. मात्र, वरील जुगारी पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख रुपये रोख, जनरेटर, ९ भ्रमणध्वनी, २ चारचाकी वाहन आणि ८ दुचाकी वाहन जप्त केले.
हेही वाचा : वाशीम: मतदानानंतर कालांतराने वाढलेल्या टक्केवारीवर आक्षेप; निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
सर्व आरोपींवर गिट्टीखदान ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे गिट्टीखदान पोलिसांना या जुगार अड्ड्याची माहिती नव्हती. ही कारवाई पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, शैलेश जांभुळकर, दिनेश डवरे, संदीप चंगोले, प्रवीण शेळके यांनी केली.