नागपूर : मैदानावर फुटबॉल खेळताना झालेल्या वादात एका मुलाने १४ वर्षीय मुलाच्या मानेवर ठोसा मारला. यात त्या मुलाचा मैदानावरच मृत्यू झाला. ही घटना यशोधरानगर ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी पोलिसांनी सध्या आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मोहम्मद इब्राहिम मोहम्मद फिरोज शेख (१४) रा. गरीब नवाजनगर असे मृत मुलाचे नाव आहे. त्याला ठोसा मारणारा १४ वर्षीय मुलगासुद्धा त्याच परिसरातच राहतो.
हेही वाचा : नागपूर : गँगस्टरवर मोक्का, इतर गुंड भूमीगत
दोन्ही मुलांचे आई-वडील हॅण्डलूम कारखान्यात काम करतात. शनिवारी दुपारी १४ वर्षीय मुलगा मित्रांसोबत परिसरातील मैदानात फुटबॉल खेळत होता. इब्राहिम मैदानात एका बाजूला असलेल्या वडाच्या झाडाखाली बसून खेळ पहात होता. यावेळी तो लहान-लहान दगड उचलून मैदानावर फेकत होता. फुटबॉल खेळणाऱ्या मुलाने त्याला मैदानावर दगड फेकण्यास मनाई केली. यावरून दोघात वाद झाला. त्यानंतर तो मुलगाही फुटबॉल खेळायला लागला. रागात त्या मुलाने इब्राहिमच्या मानेवर एक जोरदार बुक्की मारली. इब्राहिम तेथेच बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याचा मैदानावरच मृत्यू झाला.
हेही वाचा : अंबाझरी तलावात उडी घेऊन कापड व्यावसायिकाची आत्महत्या
सर्व मुले घाबरली. काहींनी घरी पळ काढला. काही मुलांनी इब्राहिमच्या आईला घटनेची माहिती दिली. मुलाला बेशुद्ध पाहून आईने तत्काळ ऑटो बोलावला आणि त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासून इब्राहिमला मृत घोषित केले. परिसरातील मुलांकडे विचारपूस केली असता एका बालकाने इब्राहिमच्या मानेवर बुक्की मारल्याची माहिती मिळाली. वडील फिरोज यांनी घटनेची माहिती यशोधरानगर पोलिसांना दिली.